Sunday, March 27, 2011

सुप्रजननम्‌

पाश्‍चात्त्य देशांत अपत्यप्राप्ती होण्याआधी "प्रिकन्सेप्शनल मेडिसीन' अर्थात, "सुप्रजननम्‌' ही कल्पना केव्हाच मूर्त स्वरूपात आलेली आहे. आपल्या देशात आयुर्वेदात सुप्रजनन कसे करावे म्हणजे चांगली गर्भधारणा आणि सुदृढ प्रजेची निर्मिती याचा विस्तृत ऊहापोह केला आहे आणि तो आयुर्वेदिक दृष्टिकोनातून आहे. आधुनिक वैद्यकशास्त्रात सुदृढ बाळ होण्यासाठी काय शक्‍य आहे, त्याचा आपण विचार करू यात.

सर्वप्रथम बघू यात, लग्नाच्या वेळी मुलामुलीचं वय काय असावं. कायद्याप्रमाणे मुलीचं लग्न करतेवेळी वय 18 वर्षांपेक्षा कमी, तसंच मुलाचं वय 21 वर्षांपेक्षा कमी नसावं. वैद्यकीय दृष्टिकोनातूनदेखील लहान वयात लग्न करणं अतिशय अयोग्य असतं. कोवळ्या वयात मुलीची शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्थिती बाळ होण्यास सर्वांगीणरीत्या परिपूर्ण नसते आणि अशा वेळी झालेली बाळं अपुऱ्या दिवसांची, कमी वजनाची असण्याची शक्‍यता खूप असते. म्हणूनच लग्न करतेवेळी मुलीचं वय 18 च्यावर व मुलाचं वय 21 वर्षांच्या वर असणं कायद्याच्या, वैद्यकशास्त्राच्या व इतरही दृष्टिकोनातून अगदी योग्यच आहे.

दुसरा मुद्दा आहे नात्यातल्या लग्नाचा. भारतात अशा अनेक जाती आहेत, की ज्यांच्यामध्ये आतेमामे भावंडं, मामाची मुलगी अशी नात्यातली लग्न, ही त्यांच्या समाजातली रूढ प्रथा आहे. नात्यात लग्न करण्याचा आनुवंशिक रोगाच्या दृष्टिकोनातून फार तोटा असतो. समजा नवरा आणि बायको आतेमामे भाऊ-बहीण आहेत. बाह्यतः दोघंही अगदी नॉर्मल आहेत. पण समजा ते दोघंही एका आनुवंशिक रोगाचे "कॅरिअर' म्हणजे "वाहक' आहेत व तो आनुवंशिक रोग थॅलेसिमिया आहे, तर अशा अवस्थेत मुलांना थॅलेसिमियाचा आजार होण्याची खूपच शक्‍यता असते आणि मग बाळाला ऍनिमिया होतो व सारखं रक्त भरावं लागतं. आईवडील जेव्हा नात्यातले असतात, तेव्हा त्या दोघांमध्ये थॅलेसिमियाची "वाहक' अवस्था असण्याची शक्‍यता खूप असते. कारण दोघांच्या "जीन्स' (गुणसूत्र) मध्ये समानता असणार, कारण त्यांचे पूर्वज एकच होते. म्हणूनच नात्यात लग्न केल्यास मुलांमध्ये आनुवंशिक आजार होण्याची शक्‍यता वाढते. अर्थातच नात्यातलं लग्न वैद्यकीय दृष्ट्या योग्य नाही. थॅलेसिमियाच्या आजाराची काही समाजात जसं की "कच्छी, लोहाना, बोहरी' यांच्यात 10 टक्‍क्‍याच्या वर "वाहक अवस्था' आढळून येते. सर्व सामान्यतः महाराष्ट्रात 3 टक्के व्यक्ती "कॅरिअर' किंवा "वाहक' आहेत. त्यामुळेच सर्व जोडप्यांची बाळ होण्यापूर्वी थॅलेसिमियाची चाचणी करावी, या संकल्पनेने सध्या मूळ धरलंय. आदिवासी समाजात दुसरा आनुवंशिक आजार म्हणजे की सिकलसेल ऍनिमिया आढळून येतो. त्यामुळे त्याचीदेखील चाचणी करावी.

तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इन्फेक्‍शन्स. आपल्या जोडीदाराला एचआयव्ही/ एड्‌सचा जंतुसंसर्ग नाही ना, हे पाहणे फार महत्त्वाचे असते. तसेच त्यास हिपॅटायटिस बी म्हणजे "ब' प्रकाराची कावीळ नाही, हेही बघणे योग्य ठरेल.

यानंतर आणखी एक महत्त्वाचं इन्फेक्‍शन म्हणजे जर्मन गोवर. समजा एखाद्या मुलीने लहानपणी एमएमआर (गोवर, गालगुंड व जर्मन गोवर) ची लस घेतलेली नाही आणि तिला गरोदरपणी पहिल्या तीन महिन्यांत जर्मन गोवर झाला, तर होणाऱ्या बाळाला मतिमंदत्व, छोटे डोके, बहिरेपण व हृदयविकार आणि कॅटॅरॅक्‍टचे अंधत्व येण्याचा धोका खूप जास्त असतो. हे सर्व आपल्याला सहज टाळता येणे शक्‍य आहे. कारण आज त्याची लस उपलब्ध आहे. जर्मन गोवराची लस गरोदर होण्याआधी तीन महिने घेतली तर हे सर्व टाळता येतं. याशिवाय टॉक्‍सोप्लासमोसिस वगैरेसारख्या इतर जंतूंनी बाळाला त्रास होऊ शकतो.

आईचं आणि वडिलांचं वय बाळ होतेवेळी फार जास्तसुद्धा नसलं पाहिजे. जर बाळ होतेवेळी आईचं वय 35 च्या वर असेल तर बाळास डाऊन सिंड्रोम होऊन मतिमंदत्व होण्याची शक्‍यता असते. तसेच वडिलांचे वय जास्त असले तर बाळात खुजेपणाचा आजार होण्याची शक्‍यता वाढते. भारतात लहान वयाच्या मातांमध्येदेखील डाऊनसिंड्रोमची बाळं झालेली आढळतात म्हणून त्यासाठी गरोदरपणी चाचण्या करणं योग्य ठरतं.

आईचा आहार बाळाच्या दृष्टीनंदेखील फार महत्त्वाचा असतो. जर आईनं गर्भ तयार होते वेळी पुरेशा हिरव्या पालेभाज्या (ज्यात फोलिक ऍसिड असते) खाल्ल्या नाहीत, तर बाळाला मेंदू व पाठीचे आवाळू असे दोष होऊ शकतात. त्याचप्रमाणे औषधे, क्ष किरण, दारू, तंबाखू, अमली द्रव्य, सगळ्याचा बाळावर हानीकारक परिणाम होऊ शकतो. याशिवाय हृदयविकार, मधुमेह यांसारख्या आनुवंशिक आजारांसंबंधीदेखील विचार व्हायला हवा.
 From : डॉ. मृदुला फडके, बालरोगतज्ज्ञ

Copied from : http://72.78.249.107/esakal/20110325/5159827724718239732.htm

* खरंच झालंय ना लग्न... *

पंधरा वर्षांच्या सहजीवनानंतर एका नवऱ्याने आपले लग्न अवैद्य ठरावे म्हणून कोर्टात दावा केला होता. त्या दांपत्यास दोन मुले होती. त्याचे म्हणणे की मी हिंदू आणि ती ख्रिस्ती. आम्ही हिंदू पद्धतीने लग्न केले. तेव्हा ती हिंदू झाली नव्हती. (तिने हिंदू धर्म स्वीकारला नव्हता.) म्हणून आमचे लग्न अवैध ठरावे.

बहुतेक विवाह धार्मिक पद्धतीने लावले जातात. हिंदू पद्धतीने लग्न लावताना वर-वधू दोघेही हिंदू हवेत. तेच ख्रिस्ती धर्माप्रमाणे लग्न लावताना दोघे ख्रिस्ती हवेत, तर मुसलमान पद्धतीने निकाह लावताना दोघेही वर-वधू मुसलमान धर्माचे हवेत. जेव्हा वर-वधू निराळ्या धर्माचे असतात आणि त्यांना धार्मिक पद्धतीने विवाह करावयाचा असल्यास दोघांपैकी एकास दुसऱ्याचा धर्म विवाहाआधी स्वीकारावा लागतो, तरच तो विवाह कायदेशीर ठरतो. वर-वधू दोघांनाही आपापला धर्म कायम ठेवून विवाह करावयाचा असल्यास त्यांना आपला विवाह "स्पेशल मॅरेज ऍक्‍ट'खाली सादर करावा लागतो. विवाह निबंधकाच्या कार्यालयात जाऊन, त्याचा फॉर्म भरून सोबत दोघांच्या वयाचा दाखला सादर करून एक महिन्याची नोटीस घ्यावी लागते. एक महिन्यानंतर पुन्हा त्या कार्यालयात तो विवाह निबंधक त्यांचे लग्न लावून लगेच विवाहाचे प्रमाणपत्र देतो. वर-वधू निराळ्या धर्माचे असल्यास विवाहाची ही पद्धत उत्तम कारण दोघेही आपापला धर्म ठेवून हा विवाह करू शकतात. सर्वसाधारण आपण यास "सिव्हिल मॅरेज' म्हणतो.

लग्न ही कायदेशीर घटना आहे. समाजाने, कायद्याने ठरविलेल्या नियमाप्रमाणेच लग्न करावे लागते. आपल्या कायद्यात कोणत्याही धार्मिक पद्धतीने विवाह करण्यास मान्यता आहे. उदा. ज्या पद्धतीमध्ये सप्तपदी आहे तिथे सातवा फेरा पूर्ण केला की विवाह होतो. हे फार नाट्यपूर्णतेने सिनेमात दाखविलेले असते. नायिकेचे जबरदस्तीने खलनायकाबरोबर लग्न लागत असते आणि सातवा फेरा पूर्ण होण्याच्या आतच नायक येतो आणि तिची सुटका करतो. जात, समाज, रिती-रिवाजाप्रमाणे जे विधी असतात ते पूर्ण झाले की विवाह झाला, असे समजले जाते आणि तो विवाह कायदेशीर मानला जातो. देवळात जाऊन नुसतेच एकमेकांच्या गळ्यात हार घालून "गंधर्व' विवाहास आजच्या कायद्याच्या जगात मान्यता नाही. तरुण वयात अजाणतेपणी अशा चुका होण्याची शक्‍यता असते.

मानवामध्ये काही नाती अशी आहेत की त्या नात्यांमध्ये विवाहास मनाई आहे. जगात कुठेही वडील-मुलगी अगर आई-मुलगा यांच्या विवाहास बंदी आहे. तसेच सख्ख्या भाऊ-बहिणीच्या नात्यामध्ये. या नात्यात पावित्र्याचे बंधन आहे. संततीमध्ये रक्त दोष निर्माण होण्याची शक्‍यता असते. शिवाय मानसिक गुंतागुंत होते. ती वेगळीच. या व्यतिरिक्त दुसरी काही नाती आहेत, त्या नात्यात विवाहास कायद्याने बंदी घातली आहे. निरनिराळ्या समाजाप्रमाणे यात थोडा बदल येतो. हिंदूंमध्ये चुलत भाऊ-बहिणीचे लग्न कायदेशीर नाही. एका हिंदू चुलत भाऊ - बहिणीचे एकमेकांवर प्रेम बसले. घरच्यांच्या नकळत त्यांनी लग्न केले. पुढे पटेना, कोर्टात त्यांनी आपण सख्खे चुलत भाऊ-बहीण आहोत, हे मान्य केले आणि आपोआपच ते लग्न अवैध ठरले. काही जमातीत आते-मामे भावंडांचे लग्न रास्त असते. निरनिराळे धर्म, जाती आपापल्या रिती-रिवाजाप्रमाणे काही नात्यांतही लग्न मान्य करीत नाहीत. प्रत्येक विवाहविषयक कायद्याच्या शेवटी परिशिष्टे असतात. त्यामध्ये त्या कायद्यानुसार कुठल्या नात्यात विवाहास बंदी आहे, याचा तक्ता दिलेला असतो. वर सूचित केल्याप्रमाणे मूलभूत नात्यात सर्वच कायद्यात बंदी आहे व बाकीच्या नात्यात थोडाफार फरक आहे.

शक्‍यतो जवळच्या नात्यात लग्न करू नये. रक्तदोष तसेच आनुषंगिक रोगाची संभावना तर वाढतेच; पण त्याबरोबर कौटुंबिक नात्यातील गुंफण पण जटिल होत जाते. समजा, आते-मामे भावंडांचे लग्न झाले आहे आणि काही कारणाने आत्या आणि मामांमध्ये भांडण झाले (मानपान, हेवेदावे, स्थावर जंगम मालमत्ता इ. अनेक कारणावरून) की त्याचा परिणाम दांपत्याच्या विवाह जीवनावर होतो आणि त्याच्या विवाहात विसंवाद निर्माण होण्याची शक्‍यता राहते. दोन्ही पालक आपापल्या अपत्यास आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतात.

काही प्रसिद्धीच्या वलयातील व्यक्ती विशेषतः नट, दिग्दर्शक इ. आपल्या पहिल्या पत्नीशी कायदेशीर घटस्फोट न घेता बेधडकपणे समाजाला धुडकावून दुसरा विवाह करतात, अशी ही तथाकथित विवाहित जोडपी कितीही वर्षे एकत्रित राहिली आणि त्यांना मुलेबाळे झाली तरी त्यांचा विवाह कायदेशीर ठरत नाही. हे सर्वसामान्य लोकांनी लक्षात ठेवावे. आपल्या जोडीदाराने कायदेशीर घटस्फोट न घेता दुसरा विवाह केला आहे, या कारणास्तव कायदेशीर पत्नी घटस्फोट मागू शकते. काही वेळेस नवरे घटस्फोटाचा दावा करतात.

घटस्फोट मिळवायच्या आतच दुसरा विवाह करतात. घटस्फोट मिळाला, की हा दुसरा विवाह आपोआप कायदेशीर होईल, अशी त्यांनी समजून असते. हे पण बरोबर नाही. त्यांना पहिल्या विवाहाच्या घटस्फोटानंतर पुन्हा विवाह करावा लागतो. तरच हा दुसरा विवाह कायदेशीर होतो. विवाहाच्या वेळी तुमचे स्टेटस (स्थान) स्पष्ट लागते. सिव्हिल मॅरेज करताना भरावयास लागणाऱ्या अर्जामध्ये याविषयी एक कलम असते. तुम्ही अविवाहित विधवा, विधुर किंवा घटस्फोटित आहात, हे त्या कलमामध्ये लिहावे लागते. घटस्फोटित असल्यास कोर्टाच्या हुकूमाची प्रत लागते.

घटस्फोटितांशी लग्न करताना घटस्फोटाच्या हुकूमनामा पाहणे अत्यावश्‍यक आहे. काही जणांना ती प्रत बघावयास मागणे संकोचाचे वाटते. ते दुसऱ्याच्या शब्दावर विश्‍वास ठेवून लग्न करतात; पण जर काही या संदर्भात समस्या उभी राहिली की घाबरून गोंधळून जातात. एका दाव्यात जेव्हा पहिल्या पत्नीने आपल्या नवऱ्यावर पोटगीची केस केली तेव्हा त्याच्या दुसऱ्या बायकोला कळले की त्याचा घटस्फोट झालेला नाही. तिचे स्थान डळमळीत झाले होते. मानसिक धक्का बसतो आणि मग घरच्यांना दोष देत राहतात. एका दाव्यात नवरा मेल्यानंतर दोन बायकांनी त्याच्या भविष्यनिधीची मागणी केली. पहिलीकडे तिच्या लग्नाचा दाखला नव्हता आणि दुसरीकडे पहिल्या घटस्फोटाचा दाखला नव्हता. कधी फसवाफसवी असते तर कधी अज्ञान.

काही जमातीमध्ये स्टॅंप पेपरवर लिहून नवरा-बायको घटस्फोट घेतात. यास "कस्टमरी डायर्व्होस' म्हणतात. तो फारच थोड्या जमातीमध्ये विधीग्राह्य आहे. (हा घटस्फोट त्या जमातीपुरताच ग्राह्य असतो.) असे हे कागद सरकारी कार्यालयात, बॅंकेत चालत नाहीत, तेव्हा घटस्फोटिताशी विवाह करताना कागद जरूर बघावा.

विवाहाने अनेक हक्क निर्माण होतात. हे नुसतेच शारीरिक, मानसिक नसून स्थावर जंगम मालमत्तेवरही असतात. तेव्हा या महत्त्वाच्या घटनेसाठी समाजाने कायद्याने नियम केले आहेत. ते विवाहाआधी समजून घेणे आपल्या हिताचे आहे.

Copied from  : http://www.esakal.in/lagnagaath/

* हवे सखोल आत्मपरीक्षण *

 स्थळं बघताना अनेक शक्‍यता आपल्यासमोर येत असतात. अनेक पर्याय उपलब्ध असतात. एखाद्या स्थळाच्या काही गोष्टी उजव्या; तर काही खटकणाऱ्या असतात. अशा वेळी वरचढ गोष्टी मान्य करताना खटकणाऱ्या गोष्टींशी तडजोड करायचा सल्ला दिला जातो. उदाहरणार्थ "मुलाचं बाकी सगळं चांगलं आहे, फक्त दोन धाकट्या बहिणींच्या लग्नाची जबाबदारी आहे' अशा वेळी, "होऊन जाईल. एकदा लग्न होऊन बहिणी गेल्या, की तुम्हीच दोघं राजा-राणी' असा सल्ला देताना बहिणींच्या लग्नाची जबाबदारी पार पाडेस्तोवर "राजा-राणी'सारखं राहायचं वय निघून जाईल, तेव्हा मारलेल्या मनाला त्याचे नंतर काहीच कौतुक वाटणार नाही आणि लग्न करणाऱ्या व्यक्तीच्या दृष्टीने याला किती महत्त्व आहे. या "गेलेल्या संधीशी' तडजोड करण्याची तिची तयारी आहे का? हे विचारात घ्यायला हवे.

दोन बहिणींच्या लग्नाची जबाबदारी याचा अर्थ कदाचित दोघांनी नोकरी करून पैसा जमवणं असाच जरी नसला, तरी नवरा काटकसरीने पैसे जमवायचा प्रयत्न करेल एवढा तर निश्‍चित असतो. कदाचित हनीमून कट, सुरुवातीच्या नव्या नवलाईच्या, "रोमान्स'च्या दिवसांतली हौसमौज कट, हॉटेलिंग, सिनेमा, फिरणं इ.कट! अगदी साधं उदाहरण म्हणजे घरून किती फोन करायचे किंवा लक्ष देऊन खोलीत कोणी नसताना विजेचे बटण बंद करणेसुद्धा!

या सगळ्यासाठी लग्न करणाऱ्या व्यक्तीची मानसिक भावनिक तयारी झाली आहे का? की तिला हा कोंडमारा वाटतोय? ही तडजोड असली तरी ती मनापासून मान्य केली जातेय, का केवळ आईवडील सांगतायत म्हणून? की केवळ आता लग्नाला आणखी उशीर झाला तर कदाचित यापेक्षा चांगले स्थळ मिळणार नाही म्हणून आहे ते स्थळ हातचे घालविण्यापेक्षा लग्नच न होण्याची "सामाजिक नामुष्की' टाळण्यासाठी होकार दिला आहे? हे पुढच्या संसाराच्या, सहजीवनाच्या दृष्टीने फार कळीचे मुद्दे ठरतात. नाइलाजाने दिलेला होकार आणि पूर्ण समजून उमजून, तडजोडीची मानसिक तयारी करून दिलेला होकार यात जमीन-अस्मानाचे अंतर असते.

दुसऱ्या उदाहरणाचा विचार केला तर कित्येक वेळा नोकरी करणारी मुलगी त्यातही उच्चशिक्षित, उच्चपदस्थ, भरपूर पगार असलेली, बॅंकिंग क्षेत्रातली चटकन पसंत पडते, पण त्याबरोबरच्या कामाच्या अनियमित वेळा, वर्ष संपण्याच्या वेळी करावे लागणारे जास्तीचे काम, पैशांच्या हिशोबाची जबाबदारी व त्याचे मानसिक ताणतणाव या गोष्टी अशा स्थळाला होकार देताना विचारात घ्यायला हव्यात.

(इथे असा नवराही भरपूर कमावणारा हवा असेल तरीही या शक्‍यता आहेतच. त्यामुळे आमचे हे कधीच घरी नसतात. मुलांच्या शाळेत, सणसमारंभ यासाठी ते कधीच येत नाहीत, याविषयी नंतर त्रागा करण्यात अर्थ नाही.)

स्त्रीच्या बाबतीत तर वेगळ्याच शक्‍यता आहेत. तिला बायको म्हणून स्वीकारताना पत्नीला ऑफिसमधून यायला उशीर होणार असेल तर किमान डाळभाताचा कुकर लावायची आपली तयारी आहे का? तिही नसेल तर बाहेरूनच जेवणाचा डबा मागवायची तयारी आहे का? नुसता डबा मागवून काम भागत नाही, तर पत्नीला उशीर झाला तरी चिडचिड न करता तिचे हसतमुखाने स्वागत करता येईल का? आपल्याला कामांमुळे उशीर झाला, कामाच्या जबाबदारीच्या तणावाखाली आपण दमून आलो, तर आपल्याला घरात ज्या शांततेची, समजून घेण्याची अपेक्षा असते तेच वातावरण आपण पत्नीसाठी घरात निर्माण करू शकू का? की आपली चिडचीडच होईल? की पत्नीने दमून आल्यावरही सारे घरकाम आटोपलेच पाहिजे, अशीच आपली अपेक्षा असेल? कारण आपल्या घरात स्वैपाकघरात पुरुष काम करीत नाहीत. की पत्नीने सकाळीच दोन्ही वेळचा स्वयंपाक करून जावा अशी आपली अपेक्षा असेल? मग त्या अपेक्षेबरोबर पूर्वतयारीसाठी तिला मदत करायची, भाजी निवडून वा चिरून द्यायची आपली तयारी असेल? की त्यासाठी मदतनीस असेल? आणि हे सारे सारे जरी असेल तरीदेखील तिच्या कामाच्या जबाबदाऱ्या लक्षात घेता घरात खेळीमेळीचे वातावरण ठेवणे आपल्याला जमेल?

त्याहीपुढे जाऊन मुलाबाळांचे अभ्यास, क्‍लासेस, आजारपणे व इतर दिनक्रम सांभाळण्याची जबाबदारी एकट्याने घेणे, कामामुळे काही घरगुती समारंभच करता न येणे किंवा अशा समारंभांना पत्नी हजर राहू न शकणे हे आपल्याला समजून घेता येईल का? की त्यात कमीपणा वाटेल? आपले विचार, कल्पना जरी आधुनिक असल्या, तरी आपले कुटुंबीय, नातेवाईक ते मान्य करून आपले व आपल्या पत्नीचे पर्यायाने आपल्या कुटुंबाचे वेगळेपण मान्य करतील का? की कालांतराने शेवटी त्यांच्या तक्रारींचे आपल्या संसारावर अनिष्ट परिणाम होतील? की आपलीही मानसिक तणावाची नोकरी असल्याने शक्‍यतो असे स्थळच नको?

एक ना दोन! एका मुद्द्यावरून इतके प्रश्‍न उभे राहतात आणि आत्मपरीक्षण इतक्‍या गहन व खोल पातळीवर जाऊन पोचते, पण आयुष्यभर नाइलाजाने संसाराचा गाडा रेटण्यापेक्षा प्रत्येक पर्यायानुसार आधीच सखोल आत्मपरीक्षण केलेले बरे, नाही का?

Copied from  : http://www.esakal.in/lagnagaath/

Saturday, March 26, 2011

*घरात वाजंत्री वाजते*

""काय? झालात ना नोकरीत पर्मनंट? मग केव्हा उडवताय बार?''

""अहो काका, नुसतं पर्मनंट होणं पुरेसं आहे का? थोडं सेव्हिंग झालं पाहिजे, राहण्याची अधिक चांगली सोय व्हायला हवी. नुसती नोकरी कायम झाली म्हणून लग्नाची घाई करण्यात काही अर्थ नाही.''

""अग शिल्पा, शिक्षण झालं ना पूर्ण तुझ्या लेकीचं. मग आता बघायला लागणार की नाही? वयाचा विचार पण नको का करायला?''

""हो, ते आहेच गं; पण एवढं शिकल्यासारखं नोकरी करून आधी स्वतःच्या पायावर उभी राहणार म्हणते आहे ती. आता या नवीन पिढीचं काय सगळेच विचार वेगळे. आपलं ऐकतात का ते?''

अगदी आपल्याच किंवा फार तर शेजारच्या घरातले वाटत आहेत ना हे संवाद? मुलगा, मुलगी "तथाकथित' लग्नाच्या वयाचे झाले, की त्यांच्याही आधी घरातले, नातेवाईक, परिचित, शेजारीपाजारी अशा सगळ्यांच्या मनात त्यांच्या लग्नाची वाजंत्री वाजायला लागते! मुलाचं, मुलीचं (समाजमान्य असं!) लग्नाचं वय, शिक्षण संपून नोकरी मिळणं (व ती कायम होणं!) थोडी बचत गाठीशी जमणं, राहण्याची सोय असणं... थोडक्‍यात स्थिरस्थावर झालेला मुलगा आणि मिळवती किंवा मिळकतीला सक्षम झालेली शिक्षित मुलगी हेच आजही मुलगा किंवा मुलगी लग्ना"योग्य' (विवाहेच्छू!) बनल्याचे निकष आहेत- पालकांच्या मनातले, त्यांच्या बहुतांशी नातेवाईक वा परिचितांच्या मनातले!

विवाहेच्छुक मुलामुलींचे पालक म्हणून आपल्यालाही हे आणि एवढेच निकष योग्य वाटतात? बदलत्या काळानुसार या निकषांमध्ये काही भर पडली पाहिजे असं आपल्याला नाही वाटत?
""आम्ही स्थळं बघायला सुरवात करण्यापूर्वी आधी विचारून घेतलं, "तुझ्या मनात कुणी नाही ना?' मगच सुरवात केली. "तुझ्या काय अपेक्षा आहेत त्याही मोकळेपणानं सांग,' म्हटलं.'
काळानुरूप आपण केवढे बदललो आहोत असं मनापासून वाटणाऱ्या एका उपवर व्यक्तीच्या आईनं मला कौतुकानं सांगितलं होतं! पण आपल्या विचारांचा बदलाचा वेग काळ ज्या झपाट्यानं बदलत आहे त्या वेगाशी सुसंगत आहे का, हा विचार त्यांच्या मनातही आला नव्हता.

वर उल्लेखलेल्या निकषांनुसार मुलगा-मुलगी "लग्नायोग्य' झाली असली, तरी जोडीदार बनायला ते "लायक' झाले आहेत का, हा प्रश्‍न पालक म्हणून आपल्या मनात डोकावतही नाही!
एक चांगला-लायक जोडीदार बनणं ही आता काळाची गरज झाली आहे आणि याची दखल घेणं ही आपली गरज! सन 1990 नंतर परिस्थिती झपाट्यानं बदलत गेली.

जागतिकीकरण, उदारीकरण, खासगीकरण हे शब्द परवलीचे बनले. यामुळे वेगानं बदलणाऱ्या आर्थिक व सामाजिक परिस्थितीचे पडसाद आपल्या जीवनावर उमटल्याशिवाय कसे राहणार होते? एव्हाना मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण वाढलेलंच होतं. आर्थिक स्वावलंबनाच्या विचारानं त्या हळूहळू मिळवत्याही होऊ लागल्या होत्या; पण आता तर त्यांची नोकरी ही अनेक कुटुंबांची गरज बनली! वाढती महागाई, वाढत्या आर्थिक गरजा, जागेची निकड व त्याचे मासिक हप्ते, नोकरी मिळण्यातली व मिळाली तर टिकण्यातली अशाश्‍वती, व्यवसायातील अस्थैर्य, घरातील जबाबदाऱ्या... अशा एक ना अनेक गोष्टींमुळे "दुहेरी उत्पन्ना'ची गरज घराघरांतून जाणवू लागली. स्वाभाविकपणे वधू कशी हवी याचेही निकष बदलले; पण वराच्या निकषांच्या बदलांची दखल घ्यायला मात्र कुणीच तयार नाही!

वाजंत्री लवकर वाजण्याचा आग्रह धरणारं हे उदाहरण तर पाहा! कॉलेजच्या सुरवातीच्या दिवसांतच ट्रेकिंगच्या ग्रुपमध्ये भेटलेल्या दोघांनी कालांतरानं एकमेकांशी लग्न करायचं ठरवलं; पण दोघांचंही सर्व शिक्षण व्हायचं होतं. मुलानं पदवी शिक्षणानंतर एमबीए करायचं ठरवलं. लग्न लांबलं. मग शिक्षण पूर्ण झालं; पण त्याला नोकरी पटकन मिळेना. मुलगा-मुलगी बरीच वर्षं एकत्र फिरत असल्यानं आता पालकांना दम निघेना!

नोकरीशिवाय लग्नाची जबाबदारी घेणं मुला-मुलीला सोयीचं वाटेना. त्यात मुलाचा भाऊ एक महिन्यासाठी अमेरिकेहून आलेला व पुढं इतक्‍यात भारतात येण्याची शक्‍यता नसलेला! त्यामुळे त्याच्या मुक्कामात लग्न व्हावं हा वाढीव दबाव! सुदैवानं भावी वधू-वरांना सोयीचं वाटेपर्यंत थांबण्यासाठी मुलाची आई ठाम राहिली!

अशा अनेक गोष्टींचा विचार आज व्हायला हवा आहे. मुला-मुलींच्या लग्नात कुटुंब व समाज हेच घटक आजही प्रभावी आहेत; परंतु लग्नाच्या केंद्रस्थानी आता ही विवाहेच्छू मुलं-मुली राहतील हे पालकांनी बघायला हवं. विवाहेच्छुक मुला-मुलींनी आधी विवाहयोग्य बनायला हवं. त्यासाठी ओळख हवी स्वतःची स्वतःशी.

मी कसा/कशी आहे याचं परखड आत्मपरिक्षण व्हायला पाहिजे. माझे गुण, दोष, व्यक्तिमत्त्वातील खास विशेष, माझ्या आवडीनिवडी, माझे प्राधान्यक्रम, आयुष्य जगण्याविषयीच्या कल्पना, भविष्याच्या योजना, मी काय स्वीकारू शकते/शकतो, काय मला नक्की हवं नि काय नक्की नको, माझा तडजोडीचा प्रवेश (area) कोणता, तिथं मी कुठवर तडजोड करू शकते/ शकतो, कशा प्रकारची जीवनशैली मला सुखकारक वाटते, संसार आणि करिअर याचा तोल मी कसा साधणार, वैवाहिक आयुष्याकडून माझ्या अपेक्षा काय, जोडीदाराकडून कशा प्रकारचं वैवाहिक नातं मला अपेक्षित आहे... असे अनेकानेक प्रश्‍न मुलामुलींनी स्वतःला विचारलं पाहिजे. एक प्रकारे हा त्यांचा "स्वअभ्यास'च असेल.

शाळा-कॉलेजमध्ये "अभ्यास कर' म्हणून सतत मुलामुलींच्या मागं लागणाऱ्या पालकांनी आता या स्वअभ्यासाची जाणीव मुलांना करून द्यायला हवी. त्यासाठी त्यांना मार्गदर्शन व उत्तेजन द्यायला हवं. मुळात हे विचार त्यांच्यात रुजवायला हवेत.

पूर्वी आठ-आठ दिवस लग्न चालायची. अनेक वयाची, नात्याची, अनुभवाची नातेवाईक मंडळी एकत्र जमायची. या मंडळींच्या सहज सल्ल्यांतून, अनुभवांच्या बोलातून, इतकंच काय उखाणे, गाणी आणि थट्टामस्करीतूनही भावी वधू-वरांना खूप "टिप्स' मिळून जायच्या. शेतीप्रधान एकत्र कुटुंबात सर्व प्रकारची माणसं सामावलीही जायची. तडजोड करण्याची सहज प्रवृत्ती असायची. आता मात्र घरातील कौटुंबिक व बाहेरची सामाजिक परिस्थिती खूपच बदलली आहे याचं भान ठेवून, पालकांनी या बदलत्या 'ट्रेंड' (trends) बद्दल मुलामुलींशी बोलायला हवं. लग्नाला कुणाला बोलवायचं नि खरेदी काय नि कोठे करायची, मेनू काय ठेवायचा यापेक्षा या अशा गोष्टी कुटुंबात बोलल्या जाणं कितीतरी अधिक गरजेचं आहे.

"नोकरी करणारी मुलगी हवी' असं म्हणणाऱ्या मुलाला त्याच्या पालकांनी "मग तुलाही घरकामात तिला सहकार्य करावं लागेल,' असं सांगितलेलं असत?

मोठ्या शहरात वाढलेल्या एका मुलाला शिक्षण संपल्यावर गावी जाऊन शेती करण्यात रस निर्माण झाला. प्रत्यक्ष तिथं राहून काम करायला लागल्यावर तो तिथंच रमला. त्याच्याच प्रमाणे शेतीत रस घेणारी, त्या आडगावातील घरात राहायला तयार असलेली मुलगी आता त्याला सहचरी म्हणून हवी आहे! पण शिकलेली!! अशा शिकलेल्या मुली तिथं जायला तयार नाहीत आणि त्या मुलाचं लग्न काही जमत नाही. ज्या वेळी त्यानं तिथं जाऊन राहण्याचा विचार बोलून दाखवला त्याच वेळी या निर्णयाची ही दुसरी बाजू नि त्यानुसारच मिळणारा प्रतिसाद याची कल्पना पालकांनी त्याला दिली असती, तर त्याचा फायदा नसता का झाला?

आमच्या माहितीतील एक लग्न नुकतंच मोडलं नि त्याला कारणीभूत झाले मुलाचे आईवडील! मुला-मुलीचं पटण्यात काही अडसर नव्हता; पण पण सासू-सुनेचं मुळीच जमेना.

"आपण वेगळे राहू' एवढंच तिचं म्हणणं होतं, जे मुलाला मान्य नव्हतं. त्यासाठी त्यानं घटस्फोटाचा पर्याय स्वीकारला! घरात वाजलेल्या सनईचे सूर असे बेसूर होणं पालक टाळू शकले नसते का?
अनुभवी पालकांचा सल्ला, मार्गदर्शन मोलाचं असतं असं आपण अनेकदा म्हणतो; पण स्वतःच्या, इतरांच्या संसाराचा अनुभव असूनही त्याचा ना प्रत्यक्ष विचार पालक करताना दिसतात ना मुलांशी हे मोकळेपणानं बोलताना दिसतात. नुसतीच वाजंत्री वाजायची घाई!

लग्न हे नुसतं करायचं नसतं तर ते निभावून न्यायचं असते. तडजोड करण्याची प्रवृत्ती कमी-कमी होत चाललेल्या आजच्या तरुण पिढीला हे निभावून नेणं दिवसेंदिवस अवघड बनत चाललं आहे.

वाढत्या घटस्फोटांची संख्या दुसरं काय सांगते आहे? पन्नास-एक वर्षांचा सहजीवनाचा पट सुखद, सुरेल करायचा तर बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणारा सक्षम जोडीदार बनायला हवं. त्यासाठी हे बदल डोळसपणे टिपायला हवेत. ते आपल्यात असण्यासाठी स्वतःची खूप मानसिक तयारी करायला हवी न्‌ पालकांनी या बदलत्या परिस्थितीची दखल घेऊन मुलामुलींना या तयारीसाठी मदत करायला हवी. येणाऱ्या नवीन सून/जावयासाठी घरसुद्धा तयार व्हायला हवं!
नाही तर आधी सनई "केव्हा' वाजणार याची घाई नि मग "का' वाजली, असं म्हणायची पाळी!!

Copied from  : http://www.esakal.in/lagnagaath/

*गोड क्षणांचा आठव...*

"जीवनाच्या वाटेवर घडती अनंत गोष्टी
जीवनसाथी सोबती येता, नातीगोती
मित्रमैत्रिणी हसत खिदळत येती
भावभावनांचे मिलन घडते विवाहवेदीवरती
त्याचे चित्रण केले असता
आठवण होते सखे सोबती!"

बारसं, वाढदिवस, लग्न या सर्व समारंभांत आठवणी जपण्यासाठी आपण आधार घेतो तो फोटोंचा. पूर्वी फोटो काढणं हा एक सोहळा असायचा. आता तो तसा राहिलेला नाही. व्हिडीओ शूटिंगमध्ये जे लाइव्ह दिसतं, ते स्थिर चित्रांच्या माध्यमातून कोण बघणार? म्हणूनच फक्‍त लग्नाच्याच वेळचं नाही, तर एकूणच छायाचित्रण जिवंत हवं, या आग्रहातून विनायक पुराणिक यांनी आपल्या वेगळ्या छायाचित्रणाला सुरुवात केली.

लग्न म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातला संस्मरणीय असा काळ. उपवर मुलं-मुली तर या क्षणांची आतुरतेने वाट पहात असतात. डिसेंबरपासून लग्नसराईला सुरुवात होते. पण लग्न कधीही असलं तरी त्याची तयारी चार-पाच महिने आधीच सुरू होते. मुला-मुलींबरोबर त्यांच्या कुटुंबीयांची घाई गडबड सुरू होते. लग्नाच्या पत्रिकांपासून हॉल कुठचा घ्यायचा, केटरर्स, सजावट ही जबाबदारी कोणाकडे सोपवायची, यासाठी खटपट सुरू होते. लग्न म्हणजे फक्‍त मंगलाष्टका आणि त्यानंतर नवरा-नवरीवर पडलेल्या अक्षता नसतात, लग्न हा एक कौटुंबिक, सामाजिक सोहळा असतो. प्रत्यक्ष लग्नाच्या मुहूर्ताच्या सहा महिने आधी तो सुरू होतो. आपल्याकडे लग्नाच्या आठवणी जपताना नेमकं हेच विसरलं जातं. लग्नाचे हजारो फोटो असतात, पण ही घाई-गडबड, हे टेन्शन त्यात कुठेही प्रतिबिंबित होत नाही. पुराणिकांनी नेमकं हेच छायाचित्रांत पकडण्याचं ठरवलं आणि आपल्या व्यवसायाला सुरुवात केली.

ज्याप्रमाणे चित्रकार आपले चित्र जिवंत करण्यासाठी त्या चित्रात आपल्या भावना ओततो, त्याचप्रमाणे छायाचित्र बोलकं करण्यासाठी त्यात नैसर्गिक हावभावांची भर टाकायला हवी, हे पुराणिकांच्या डोक्‍यात पक्‍कं होतं आणि आहे. म्हणूनच त्यांची फोटोग्राफी ही लग्नाच्या दिवसापुरती नसते, लग्नघरी जायला ते सुरुवात करतात ते लग्नाच्या पंधरा दिवस आधीच. मुलामुलींची आवड-निवड, त्यांचा स्वभाव जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यासाठी योग्य आहार, त्वचेची काळजी कशी घ्यावी, या संदर्भात योग्य ते मार्गदर्शनही करतात. छायाचित्रणाच्या दृष्टीने लग्नाचा मंडप अधिक उठावदार कसा दिसेल, त्यासाठी सजावट कशी असावी, रंगसंगती कशी असावी याची माहिती देतात. नवरानवरीने परिधान करायचे कपडे कुठल्या रंगाचे असावेत, की जेणेकरून त्यात त्यांचं व्यक्तिमत्त्व अधिक खुलून दिसेल, हेही ते सुचवतात. मुलामुलींची आवडनिवड जाणून रंगाची निवड करण्यात येते. आपल्याकडे लग्नात नवरानवरीने एकमेकांना घालायचे हार असतात ते लिलीचे किंवा फार तर गुलाबाचे. पण एखादीला ऑर्किड आवडत असेल आणि तिला घालायला ऑर्किडचा हार दिला तर... तिला अनपेक्षित असणारी गोष्ट घडते, ती अधिक सुखावून जाते आणि तिच्या चेहऱ्यावर जे भाव उमटतात त्यांना तोड नाही... लग्न लागताना अंतरपाट धरतात तेव्हा नवरानवरीमध्ये अगदी दोन पावलांचं अंतर असतं. पण अंतरपाटाच्या अलीकडे असताना मुलीच्या चेहऱ्यावरचं टेन्शन, तिचे भरून आलेले डोळे अंतरपाट बाजूला केल्यावर मात्र झर्रकन बदलतात... ती पूर्ण त्याचीच होऊन जाते... तिच्या चेहऱ्यावरचे हेच भाव टिपून घ्यायचे असतात...

हे सगळं टिपण्यासाठी पुराणिकांची छायाचित्रकारांची टीम धडपडत असते. सप्तपदीतील सर्व विधी टिपून घेण्याकरता लग्नाच्या वेळी त्यांचे कमीत कमी तीन आणि जास्तीत जास्त आठ छायाचित्रकार उपस्थित असतात. लग्नाच्या दिवशी मुलाकडे एक, मुलीकडे दुसरा, तर लग्नाच्या हॉलवर तिसरा; अशी त्यांची आखणी करण्यात येते. नैसर्गिक प्रकाशात छायाचित्र काढण्याकडे त्यांचा अधिक कल असतो. त्यामुळे लाईटस्‌चा वापर कमी प्रमाणात करण्यात येतो. त्यानंतर तयार करणार येणारा अल्बम अधिक पाहण्याजोगा असतो. बऱ्याच लग्नाच्या अल्बमची सुरवात होते ती लग्नाची पत्रिका लावून. पुराणिक मात्र त्याची सुरुवात कधी कुलस्वामिनीच्या फोटोने, तर कधी मुलीच्या बालपणापासून आजवरच्या फोटोंच्या कोलाजपासून सुरू करतात. अशा प्रकारच्या छायाचित्रांना कमीत कमी 25 हजार तर जास्तीत जास्त लाखापर्यंत पैसे मोजावे लागतात. पण लग्न हा आयुष्यातल्या आठवणींचा ठेवा असतो... त्यासाठी अनेक जण खर्च करायला सहज तयार होतात.

"छायाचित्रणाच्या संकल्पनेत इतके आमूलाग्र बदल झाले असले तरी छायाचित्रणाला व्यावसायिकदृष्ट्या कोणीच पाहात नाही. आपल्या आयुष्यातील आनंदाचे क्षण टिपून घेऊन त्यांचं जतन करून ठेवणाऱ्या छायाचित्र कलेला अभ्यासात समाविष्ट करून घेण्याची गरज आहे. तरच छायाचित्रणाला अधिक महत्त्व प्राप्त होईल,' पुराणिक सांगतात. या कलेचं महत्त्व सांगण्यासाठी आणि अशा प्रकारचं छायाचित्रण कसं केलं जातं हे शिकवण्यासाठी पुराणिक मार्गदर्शक वर्गही चालवतात.

Copied from  : http://www.esakal.in/lagnagaath/

*ग्रुम ऑर ग्रुमिंग!!! *

'हम आपके हैं कौन' या चित्रपटातून आपल्याला काय बोध मिळाला? हा प्रश्‍न तुमची फिरकी घेण्यासाठी नाही हं विचारला. प्रश्‍न विचारण्यामागे काही कारण आहे. हम आपके...या चित्रपटातून लग्न कसं असतं, याची पूर्ण माहिती व कॅसेट नाही का पाहायला मिळाली. सूरज बडजात्यांचं यासाठी कौतुक करावं तितकं कमीच!

हम आपके...च्या माध्यमातून प्रत्येक मराठी घराला लग्नाला आलेलं ग्लॅमर तर कळलंच, पण हिंदी संस्कृतीत असणारे संगीत, मेहंदी, टिका यासारखे कार्यक्रम व रीतीरिवाज मराठमोळ्या घरांमध्ये कधी साजरे होऊ घातले कळलंच नाही. विरंगुळा म्हणून केलेले हे सोहळे लाखोंच्या घरात गेले तरी हौस म्हणून लग्न हा एक इव्हेंट झालेला आहे. खरेदीपासून ते हनिमूनपर्यंत प्रत्येक गोष्टीला एक वेगळंच ग्लॅमर व महत्त्व आलेलं आहे.

लग्नसराईच्या काळात ही उपयुक्त माहिती खास तुमच्यासाठी....
एव्हाना घरी लग्नपत्रिकांचे ढीग लागले असतील की नाही? अहो का काय विचारता? लग्नाचा सीझन नाही का! लग्न म्हटलं की सर्वात आधी समोर येते ती खरेदी. खरेदी आणि स्त्रिया हे समीकरणच जणू. अर्थात खरेदी करण्यात केवळ स्त्रियाच पुढे नसतात, तर लग्नात खरेदी करण्यासाठी आज-काल पुरुषही मागे नाहीत बरं का! आता तुम्ही म्हणाल, पुरुषांची ती काय खरेदी असणार? पुरुषांची जास्तीत जास्त काय तर कपडे! पण नाही, काळ बदलला, खरेदीची गणितं बदलली व ट्रेंडही बदलला. हल्ली स्त्रियांपेक्षा पुरुष खरेदीबाबत अधिक चुझी झालेले आहेत. मॅचिंगचा पुरुषांना काय सेन्स आहे, असं म्हणणाऱ्यांच्या आता मात्र चपराक बसण्यासारखंच आहे. स्त्रियांप्रमाणे पुरुषही आता कोणत्याच बाबतीत मागे नाहीत. खासकरून लग्नाची खरेदी करण्यात तर ते पुढेच असतात.

पूर्वी एक सफारी किंवा बूट व इतर तत्सम खरेदी केली की यांची लग्नाची खरेदी व्हायची. आज मात्र तेही ब्रॅण्डेड वस्तूंची हौस भागवताना दिसतात. लग्नाला केवळ एकच ड्रेस नाही तर साखरपुडा ते रिसेप्शन प्रत्येक वेळी वेगळा व नवीन स्टाईलचा ड्रेस, त्यावर त्याला अनुसरून दागिने. सूटवर बूट, तर शेरवानीवर एखादी मॉडर्न जूती किंवा मोजडीच हवी. शेरवानीला बटन्स कशी असावीत, त्यावर जॅकेट असावं की नाही, उंची किती, गुडघ्यापर्यंत की त्यापेक्षा थोडी लांब... या व अनेक बाबतीत आज पुरुष सजग झाले आहेत. बटन्स हवीत की नेहरू कॉलर, चुडीदारला चुन्या हव्यात का, ट्राऊझर व चुडीदार यांचा कॉण्ट्रास्ट हवा. जास्त एम्ब्रॉयडरी नको, नाही तर ते गॉडी दिसेल! या व इतर अनेक त्यांच्या मागण्या आहेत. इतकंच नाही, तर नवरीच्या शालूचा कलर कोणता, यावर त्यांच्या ड्रेसचा कलर ठरतो. आता मात्र त्यांच्या ड्रेसच्या कलर्सवरून मुलींना स्वतःचे कपडे घ्यायचे ठरवायला लागतात. कपड्यांचा विषय थोडा बाजूलाच राहूदे. मेकअप आणि पुरुष... नाक मुरडलंत ना! परंतु मेकअपच्या बाबतीतही हे मागे नाहीत हं! हळदीचा कलर जास्त दिसतो, त्यामुळे चेहरा नीट दिसणार नाही. म्हणून फेशियल करण्याकरता दुसऱ्या दिवशी लगेच जेन्टस्‌ पार्लरमध्ये जाऊन हेअर मसाज, फेशियल, दाढी, याबरोबर केसांना रंग या सर्व गोष्टी अगदी इत्थंभूत करून घेतातच घेतात. दागिन्यांच्या बाबतही हे मागे राहणार नाहीत. शेरवानीबरोबर दागिना हवा तर तो डायमंडचाच, सोन्याचा चालणार नाही. चेनमध्ये पेंडल म्हणून वाघाचं नख हवं का? तर या प्रश्‍नावर नाही, ती आता जुनी स्टाइल झाली आहे, असं पटकन सांगूनही मोकळे. सोन्यापेक्षा प्लॅटिनम व डायमंडस्‌ ही पुरुषांची पहिली पसंती असलेली सध्या दिसत आहे. पाहिलंत ना, नटणं हा केवळ स्त्रियांचा प्रांत नाही, तर आता पुरुषही यात मागे नाहीत!

Copied from  : http://www.esakal.in/lagnagaath/

* विवाहाचा गुंता आणि ज्योतिष! *

स्थित्यंतरे म्हणजे जीवन असे म्हटल्यास वावगे होणार नाही. स्थित्यंतर या शब्दात अनेक गोष्टी येतात. माणूस वयाने लहानाचा मोठा होत जातो. हे एक हळूहळू होणारे स्थित्यंतरच होय. या स्थित्यंतराच्या अनुषंगाने व्यक्तीमध्ये महत्त्वाचे असे मानसिक, शारीरिक बदल नैसर्गिकरीत्याच घडत असतात. स्त्री आणि पुरुष यांची शारीरिक, मानसिक, जडणघडण अतिशय भिन्न आहे, आणि वरील स्थित्यंतरात या त्यांच्या घडणावळीत भिन्न अशी त्यांची रूपे किंवा पैलू निदर्शनास येतात.

माणूस म्हणून स्त्री आणि पुरुष एक असले तरी व्यक्ती म्हणून त्या भिन्न प्रकृती आहेत. स्त्री आणि पुरुष हा भेद अनेक अंगांनी साऱ्या जगाला व्यापून राहिला आहे. त्यात स्त्री-पुरुषांचा विवाहसंबंध ही गोष्ट तर जगाच्या मानसशास्त्रावरच परिणाम करते किंवा सध्या तर ती अतिशय नाजूकरीत्या करत आहे.

बहुतांश मानसिक आजार हे स्त्री-पुरुष संबंधांतूनच उद्‌भवत असतात. त्याला कारणे अनेक आहेत. पूर्वी विवाह योग्य वेळी करण्यामागे पालकांचा आग्रह शास्त्रीय व मानसशास्त्राच्या भूमिकेतून अतिशय योग्य असाच असे.

आता काळ बदललाय. जीवनातील तथाकथित स्थैर्याला प्राधान्य देत देत विवाह या अतिशय महत्त्वपूर्ण गोष्टीकडे दुर्लक्ष केले जाते किंवा त्याच्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही, आणि माणूस नुसता पळत राहतो. ज्या वेळी माणूस विवाहाला उभा राहतो, त्या वेळी आवश्‍यक असलेले सतेज आणि सहज असे तारुण्य अस्तित्वात नसतेच. पूर्वग्रहदूषित, आजूबाजूच्या विकृत संस्कारांतून अवतरलेले, आणि तथाकथित बुद्धिवादातून करपलेल्या तारुण्याच्या प्रभावातच विवाह होत आहेत, आणि समाजाचे मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडत चाललेय.

विवाह मिलन आणि ज्योतिष
प्रास्ताविकात म्हटल्याप्रमाणे विवाह संकल्पनाच बदलत आहेत. ज्योतिषशास्त्रातील विवाह गुणमिलनाचा विचार पूर्वीच्या समाजपद्धतीनुसार मांडला गेला आहे. अर्थात त्याचा पाया काही प्रमाणभूत तत्त्वांवर आधारला आहे. त्याचा योग्य असा आधार घेऊन विवाह ठरवण्यास हरकत नाही, परंतु तसे होत नाही. अतिशय एकांगी प्रकारातून ज्योतिषी हा प्रश्‍न हाताळतात आणि विवाहमिलनामध्ये ज्योतिषी आणखी एक पापग्रह होऊन बसतो.

सध्या विवाहाचे वय प्रचंड वाढलेय. अठ्ठावीस किंवा एकोणतीस वयापर्यंत मुले विवाह करत नाहीत. ज्या वेळी ती विवाहासाठी उभी राहतात त्या वेळी त्यांचे वय एका अशा सीमारेषेवर असते, की जरा विवाहास उशीर झाल्यास ही मुले पुढच्या वयोगटात जाऊन त्यांचा विवाह आणखी लांबतो, आणि योग्य वयोगट न मिळाल्याने विवाहप्रस्तावांची संख्या अतिशय रोडावते.
सध्या माणसे अतिशय चुकीची पद्धत अनुसरत आहेत. आलेले मर्यादित असे विवाहप्रस्ताव पाहण्याचे प्रोग्रॅम न करताच परस्पर पत्रिकेच्या नावावर धुडकारले जातात. मुलामुलींच्या पत्रिकांचे मॅचिंग अतिशय एकांगी दृष्टिकोनातून केले जाते.

खरे पाहायला गेले तर आपल्या नशिबाप्रमाणेच किंवा पत्रिकेनुसारच विवाहप्रस्ताव आपल्या पुढ्यात येत असतात. अशा वेळी बऱ्याच वेळा दैव देते आणि कर्म नेते, असेच घडते.
पत्रिकेतील ग्रहयोगांचा संदर्भ जीवनातील अनेक गोष्टींशी असतो. काही वेळा तो पूर्वजन्माशीही असतो. विवाह ही एकट गोष्ट पत्रिकेतील ग्रह टार्गेट करत नसतात. त्यांना इतरही अनेक उद्योग करायचे असतात. सध्या अल्पसे ज्योतिष ज्ञान असलेल्या व्यक्तीही विवाहमिलनासारख्या महत्त्वाच्या विषयात नाक खुपसत असतात आणि मुलामुलीचा विवाहप्रश्‍न आणखीनच गुंतागुंतीचा करत असतात.

विवाह होण्यासाठी काय कराल?
1) प्रथम आपणास योग्य असलेली विवाहस्थळे प्रत्यक्ष पाहून त्यांचा एक गट करा आणि या गटातूनच पत्रिकेचा आणि व्यवहाराचा ताळमेळ घालून पसंतीक्रम ठरवा.

2) ओळखीच्या स्थळांना अधिक प्राधान्य द्या. मग पत्रिकेचा अट्टहास करू नका! नाहीतर दैव देते आणि कर्म नेते असे होते.

3) मुलामुलींना विशिष्ट असे परस्पर प्रस्ताव आले असतील तर त्याचा संशय न घेता गांभीर्याने विचार करा.

4) तरुण-तरुणींनी ज्योतिष माध्यमाचा पूर्वग्रह ठेवून अजिबात स्थळे बघू नयेत आणि मनोरुग्णता वाढवू नये.

5) ज्या वेळी तरुण-तरुणी ठाम असतील त्या वेळी ज्योतिषी आणि पालक यांनी अजिबात हस्तक्षेप करू नये.

6) महानगरात राहणारे तरुण-तरुणी हा विवाहासाठी वेगळा विषय होऊ शकतो. त्याला ज्योतिषाव्यतिरिक्‍त अनेक संदर्भ येऊ शकतात. तेथे पत्रिकामिलन हा एक फार्स होऊ शकतो. तेथे पत्रिका बघूच नयेत.

7) गुणमिलनाचा आकडा हा म्हणजे काही सर्वस्व नसतो इतके जीवन सरळ, साधे किंवा सोपे झाले असते तर बघायला नको!

Cool बऱ्याच वेळा तरुण-तरुणींचा आतला आवाजच विवाह ठरवतो, आणि त्यांनी आपल्या अंतःस्फूर्तीनुसारच निर्णय घ्यावेत, असे आम्हाला वाटते.

9) अनेक वेळा ज्योतिष्यालाही घोळात घेतले जाते, हे तरुण-तरुणींनी पूर्ण लक्षात ठेवून तारतम्य बाळगून निर्णय घ्यावा.

10) पत्रिका न बघता केलेल्या व्यक्तींचे घटस्फोटांचे प्रमाण अत्यल्प आहे, ही आश्‍चर्याची बाब लक्षात ठेवावी. येथे स्त्री-पुरुषांची सहजप्रवृत्ती किंवा अंतःप्रेरणाच महत्त्वाची ठरली आहे.

विवाहगुणमीलन कोष्टक केवळ चंद्राच्या नक्षत्राच्या गतस्थितीवर अवलंबून असल्याने त्या कोष्टकाच्या आधारे विवाह जमवणे बऱ्याचदा एकांगी ठरू शकते. वधूवरांच्या पत्रिकेतील इतर ग्रहस्थितीचेही मॅचिंग करणे क्रमप्राप्त ठरत असते. चंद्राकडून जसे शडाष्टक योग होतात, तसेच लग्नराशीकडूनही शडाष्टक होत असतात. काही वेळेला वधूवरांच्या पत्रिकेत लग्नाकडूनचे ग्रह त्यांच्या स्वभाव गुणदोषांवर परिणाम करत असतात. वधुवरांच्या पत्रिकेतील स्त्री-पुरुष राशीतील ग्रहांचे मॅचिंग त्यांच्या शारीरिक, मानसिक मिलनावर अनुकुल किंवा प्रतिकूल निश्‍चितच बोलतात. त्यांच्या पत्रिकेतील मनुष्य आणि राक्षसगणी नक्षत्रातील ग्रहांचा समतोल जमणेही आवश्‍यक ठरते. बऱ्याच वेळेस पत्रिका चंद्रराशीकडून जमत नसल्यास इतर ग्रहांचे किंवा लग्नराशींचे मॅचिंग योग्य असल्यास गुणमीलनातील विशिष्ट बेरीज वजाबाकी करून निष्णात ज्योतिषी निर्णय घेतात. ते अतिशय योग्य ठरतात.

एकनाडीचा दोषही वधूवरांच्या पत्रिकेतील विशिष्ट ग्रहांच्या परस्पर संबंधातून निघून जात असतो. हे सर्व बारकाईने बघितल्यासच त्या गुणमिलनात अर्थ राहातो.

Copied from  : http://www.esakal.in/lagnagaath/

* विवाहसंस्कार विधी *

देव, ब्राह्मण, अग्नी अन उपस्थित समाज यांना साक्षी ठेवून संपन्न होणाऱ्या विवाहविधीस धर्मशास्त्रात मानाचे स्थान आहे. तसेच दानातील महान पुण्यकारक असे जे 'कन्यादान' त्याचेही महतभाग्य याच विवाह विधीद्वारे वधुपित्यास प्राप्त होते.

ज्या अनेक महत्त्वपूर्ण अन आवश्‍यक विधिसंस्कार यातून हा विवाहविधी साजरा होतो तो पुढीलप्रमाणे :-

पत्रिका आणि पसंती : अनुरूप वधू-वरांची निवड करीत असताना दोघेही परस्परांना शिक्षण, रूप, सांपत्तिक स्थिती या गोष्टींतून किती व कसे अनुरूप आहेत, हे पाहत असतानाच- उभयतांचे गण, गोत्र, गुण-मिलन अन चंद्रबल, लाभालाभ यांचा विचार पत्रिका पाहणे यात मोडतो. अन एकदा का ब्राह्मण, गुरुजी, ज्योतिषी यांच्याकडून पत्रिका जुळत असल्याचे समजले, वधू-वरांची व उभय घराण्यांची पसंती झाली, की मग प्रारंभ होतो पुढील कार्यक्रमांना!

प्रत्यक्ष लग्नाआधी एखादा चांगला दिवस पाहून वराकडील मंडळी वधूकडे जाऊन तिला समारंभपूर्वक कुंकू लावून साडी भेट देतात. या समारंभात उभय वधू-वरास यथोचित भेटवस्तूही देतात. तसेच पुढील कार्याच्या याद्या करणे, हळद फोडणे हे कार्यक्रमही याच वेळी करतात. या प्रारंभीच्या परिचय कार्यक्रमांची सांगता चहा-पान, फराळ याचबरोबर पेढेवाटपाने होते. वधूला साडीबरोबरच पेढ्याचा पुडा देतात अन म्हणूनच हा प्रसंग साखरपुड्याच्या गोडीने सर्वांच्या लक्षात राहतो.

पत्रिका : पसंती अन साखरपुडा झाला, की एकच धावपळ चालू होते अन मग वेध लागतात ते प्रत्यक्ष लग्नाच्या दिवसाचे.

सीमांत-पूजन : लग्नाच्या आदल्या दिवशी रात्री हा कार्यक्रम कार्यालयात साजरा होतो. पूर्वी वरपक्षाकडील मंडळींचे वधूपक्षाकडील मंडळींकडून गावच्या सीमेवर हे स्वागत पूजन होत असे. त्यावरून त्याचे नाव सीमांत-पूजन असे पडले आहे. त्यामागचा आणखी एक गूढार्थ असा, की आता उभय पक्षांकडील सीमांचा अंत होऊन दोघेही एकत्र येत आहोत अन पुढील कार्य हे समजूत, एकोपा, प्रेम अन जिव्हाळ्याने संपन्न करायचा आहे.

याच वेळी होणाऱ्या धार्मिक विधीचा नीट साधक-बाधक विचार केला, तर त्यालाच "श्रीमंत' किंवा "श्री' पूजन असेही मानणे योग्य ठरेल. कारण वधुपिता हा अनुरूप योग्य अशा त्या श्रीमानास आपण आपली कन्या प्रदान करत असतो ना!

घाणाभरण अन हळदी समारंभ : पूर्वी हे विधी विवाहाच्या आधी होत असले, तरी सध्या मात्र त्यामागची भावना, महत्त्व अन शास्त्र लक्षात घेता या गोष्टी विवाहाच्या दिवशीच कार्यालयात पहाटे केल्या जातात. आंब्यांच्या पानांना सुशोभित केलेल्या दोन मुसळांचे पूजन अन घाणाभरण्याच्या ओव्या म्हणत सुवासिनींद्वारे हा घाणा भरला जातो. त्याच मुसळांनी उखळ किंवा रोळीत उडीद, हळकुंड, सुपारी व तांदूळ कांडतात.

घाणाभरणानंतर त्यातीलच हळद वधू-वरांना लावतात. वधूस हळद लावून मंगलस्नान घालतात. वराकडून आलेली हळद वधूस लावण्याची जी पद्धत आहे, तीच या प्रकारच्या "उष्टी हळद' या नामाचे मर्म सांगून जाते.

देवदेवक/ पुण्याहवाचन : शास्त्रोक्त संकल्प, गणेशपूजा देव-देवक प्रतिष्ठापना, स्वस्तिवाचन, मातृका पूजन इ. गोष्टी ज्या कार्यक्रमात विधिपूर्वक केल्या जातात, त्यालाच देवक ठेवणे असे म्हणतात. हा विधी उभय पक्षांना वेगवेगळा करायचा असतो. याच वेळी यजमानास व नवरा-नवरीस जवळच्या व घरच्या आप्तेष्टांनी आहेर करायचा असतो. त्यालाच "घरचा आहेर' असेही म्हणतात.

गौरीपूजन : विवाहास सजून, नटूनथटून तयार झालेली नववधू बोहल्यावर येण्यापूर्वी जे गौरीहरांचे पूजन केले जाते त्यालाच गौरीहरपूजन असे म्हणतात. चौरंग किंवा पाटावर गौरीहर यांच्या प्रतिमा ठेवून त्याचे पूजन वधूने अक्षता समर्पित करीत व "हे गौरीमाते, मला सौभाग्य, सुख व संतती दे' अशी प्रार्थना करीत पूर्ण करायचे असते.

मंगलाक्षता आणि शुभमंगल सावधान : सुशोभित विवाह मंडपात वर येताच "मुलीचे मामा! मुलीला आणा' ही सूचना दिली जाते. अक्षतांचे वाटप होते. वधू-वरांच्या हाती पुष्पमाला देऊन त्यांना परस्परांसमोर दृष्टादृष्ट न होईल अर्थात अंतरपाट मध्ये धरून उभे केले जाते. दोघांच्याही मागे जवळचे नातेवाईक तसेच करवल्याही उभ्या असतात. मुहूर्ताच्या थोडे आधीच ईश-वंदना, शुभाशीर्वाद- अभीष्टचिंतनपर, काव्यात्मक जे भावप्रदर्शन केले जाते- तेच मंगलाष्टक गायन.
नंतर नियोजित मुहूर्त समयाला "तदेव लग्नं....' या मंगलाष्टकाने सांगता करीत शास्त्रोक्त मंत्रोच्चारांनी विवाह संपन्न केला जातो. अंतरपाट दूर केला जातो. वधू-वर परस्परांना पुष्पमाला घालतात. बॅंड वाजंत्री वाजते आणि टाळ्यांच्या गजरात लागले लग्न... झाला विवाह संपन्न याची ग्वाही मिळते.

कन्यादान : लग्नानंतर पूर्वाभिमुख उभ्या असणाऱ्या वराच्या ओंजळीत वधूपिता पाण्याची धार धरतो, ते पाणी वधूची आई घालते. त्या वेळी कन्यादानाचा मंत्रोच्चार होतो व "मी माझ्या कन्या आपल्याला दान देतो आहे' असे वधूपिता म्हणतो. तसेच या कन्यादानाची स्वीकृतीही तेथेच वरास द्यावी लागते. याच वेळी "धर्मेच, अर्थेच, कामेच नातिचरामि' असे अभिवचनही वरास वधूपित्याला द्यावे लागते.

कंकण बंधन व लाजा होम : कन्यादानानंतर ब्राह्मण, पुरोहित हे वधुवरांना कंकण बंधन करतात. त्यासाठी दुधात भिजवलेले सूत, दुहेरी सूत वराच्या कंठीजवळ वेष्टित असते. ते वधूच्या डाव्या मनगटावर बांधतात. तर वधूच्या कमरेजवळ वेढलेले सूत वराच्या उजव्या मनगटावर बांधतात. हे एक मंत्रोक्त नाजूक प्रीतीधाग्याचे अतूट बंधन असते. त्याच वेळेस वर वधूस सौभाग्याचे लेणे देतो. अर्थात मंगळसूत्र गळ्यात घालतो.

या वेळी वधू-वराने एकमेकांस डोके लावण्याचा जो प्रघात आहे, त्यामागे इथून पुढील भावी आयुष्यात परस्परांना एकमताने व एकविचाराने चालण्याची ग्वाही अभिप्रेत आहे.

त्यानंतर योनक नावाच्या अग्नीला तुपाची आहुती व वधूच्या भावाने बहिणीच्या हाती दिलेल्या लाह्या या वराने आपल्या हाती घेऊन त्या मंत्रोच्चारानुसार अग्नीस अर्पण करायच्या असतात. कानपिळीचा विधी येथेच संपन्न होतो. त्या वेळी अग्नीसाक्षीने आम्ही उभयता परस्परांवर प्रेम करून व सदैव एकमेकांच्या बरोबर निष्कपटपणे वागू, अशी शपथ घ्यावयाची असते.

सप्तपदी : "सात पाऊले संगती तुझ्या' असे म्हणत विवाह होमाच्या जवळ मांडलेल्या तांदळाच्या सात छोट्या छोट्या ढिगांवरून वरामागून वधू चालत जाते. ही सात पावलांची चाल सप्त जन्मांतरीच्या एकोप्याची व एकत्र वाटचालीची प्रतीकात्मक साक्ष असते. कार्यालयातील शेवटचा कार्यक्रम म्हणजे जेवण. या वेळी वधू पक्षाकडील मंडळी वर पक्षाकडील वडीलधाऱ्या मंडळींना मुलीची नीट काळजी घेण्याची व संगोपन करण्याची विनंती करतात.

गृहप्रवेश अन लक्ष्मीपूजन : आपल्या संस्कृतीप्रमाणे नवदांपत्यास "लक्ष्मीनारायण' मानण्याची पद्धत आहे. ज्या वेळी ही नूतन वधू आपल्या सासरी म्हणजे नवऱ्याचा घरात प्रवेश करते, त्याला गृहप्रवेश असे म्हणतात.

उंबरठ्यावरचे तांदळाचे माप लवंडून त्या नववधूने लक्ष्मीच्या सोनपावलांनी सुख-समृद्धीसह त्या घरात प्रवेस करावा, असाच या प्रथेमागचा खरा भावार्थ आहे. त्यानंतर घरी आलेल्या त्या गृहलक्ष्मीचे यथोचित पूजन करमे अन मग भरल्या तांदळाच्या ताटात सोन्याचा अंगठीने पुढील वैवाहिक जीवनातील तिच्या पतीच्या आवडीचे नाव लिहिले जाते. ते नावच तेथून पुढे ती सौभाग्यवती म्हणून धारण करते.

साखर वाटून हे नाव सर्वांना सांगितले जाते. असे आहेत हे विवाह सोहळ्यातील आवश्‍यक अन महत्त्वाचे विधी. अन असा आहे हा आगळावेगळा अन हवाहवासा वाटणारा संस्कार सोहळा!!

Copied from  : http://www.esakal.in/lagnagaath/