Sunday, March 27, 2011

* खरंच झालंय ना लग्न... *

पंधरा वर्षांच्या सहजीवनानंतर एका नवऱ्याने आपले लग्न अवैद्य ठरावे म्हणून कोर्टात दावा केला होता. त्या दांपत्यास दोन मुले होती. त्याचे म्हणणे की मी हिंदू आणि ती ख्रिस्ती. आम्ही हिंदू पद्धतीने लग्न केले. तेव्हा ती हिंदू झाली नव्हती. (तिने हिंदू धर्म स्वीकारला नव्हता.) म्हणून आमचे लग्न अवैध ठरावे.

बहुतेक विवाह धार्मिक पद्धतीने लावले जातात. हिंदू पद्धतीने लग्न लावताना वर-वधू दोघेही हिंदू हवेत. तेच ख्रिस्ती धर्माप्रमाणे लग्न लावताना दोघे ख्रिस्ती हवेत, तर मुसलमान पद्धतीने निकाह लावताना दोघेही वर-वधू मुसलमान धर्माचे हवेत. जेव्हा वर-वधू निराळ्या धर्माचे असतात आणि त्यांना धार्मिक पद्धतीने विवाह करावयाचा असल्यास दोघांपैकी एकास दुसऱ्याचा धर्म विवाहाआधी स्वीकारावा लागतो, तरच तो विवाह कायदेशीर ठरतो. वर-वधू दोघांनाही आपापला धर्म कायम ठेवून विवाह करावयाचा असल्यास त्यांना आपला विवाह "स्पेशल मॅरेज ऍक्‍ट'खाली सादर करावा लागतो. विवाह निबंधकाच्या कार्यालयात जाऊन, त्याचा फॉर्म भरून सोबत दोघांच्या वयाचा दाखला सादर करून एक महिन्याची नोटीस घ्यावी लागते. एक महिन्यानंतर पुन्हा त्या कार्यालयात तो विवाह निबंधक त्यांचे लग्न लावून लगेच विवाहाचे प्रमाणपत्र देतो. वर-वधू निराळ्या धर्माचे असल्यास विवाहाची ही पद्धत उत्तम कारण दोघेही आपापला धर्म ठेवून हा विवाह करू शकतात. सर्वसाधारण आपण यास "सिव्हिल मॅरेज' म्हणतो.

लग्न ही कायदेशीर घटना आहे. समाजाने, कायद्याने ठरविलेल्या नियमाप्रमाणेच लग्न करावे लागते. आपल्या कायद्यात कोणत्याही धार्मिक पद्धतीने विवाह करण्यास मान्यता आहे. उदा. ज्या पद्धतीमध्ये सप्तपदी आहे तिथे सातवा फेरा पूर्ण केला की विवाह होतो. हे फार नाट्यपूर्णतेने सिनेमात दाखविलेले असते. नायिकेचे जबरदस्तीने खलनायकाबरोबर लग्न लागत असते आणि सातवा फेरा पूर्ण होण्याच्या आतच नायक येतो आणि तिची सुटका करतो. जात, समाज, रिती-रिवाजाप्रमाणे जे विधी असतात ते पूर्ण झाले की विवाह झाला, असे समजले जाते आणि तो विवाह कायदेशीर मानला जातो. देवळात जाऊन नुसतेच एकमेकांच्या गळ्यात हार घालून "गंधर्व' विवाहास आजच्या कायद्याच्या जगात मान्यता नाही. तरुण वयात अजाणतेपणी अशा चुका होण्याची शक्‍यता असते.

मानवामध्ये काही नाती अशी आहेत की त्या नात्यांमध्ये विवाहास मनाई आहे. जगात कुठेही वडील-मुलगी अगर आई-मुलगा यांच्या विवाहास बंदी आहे. तसेच सख्ख्या भाऊ-बहिणीच्या नात्यामध्ये. या नात्यात पावित्र्याचे बंधन आहे. संततीमध्ये रक्त दोष निर्माण होण्याची शक्‍यता असते. शिवाय मानसिक गुंतागुंत होते. ती वेगळीच. या व्यतिरिक्त दुसरी काही नाती आहेत, त्या नात्यात विवाहास कायद्याने बंदी घातली आहे. निरनिराळ्या समाजाप्रमाणे यात थोडा बदल येतो. हिंदूंमध्ये चुलत भाऊ-बहिणीचे लग्न कायदेशीर नाही. एका हिंदू चुलत भाऊ - बहिणीचे एकमेकांवर प्रेम बसले. घरच्यांच्या नकळत त्यांनी लग्न केले. पुढे पटेना, कोर्टात त्यांनी आपण सख्खे चुलत भाऊ-बहीण आहोत, हे मान्य केले आणि आपोआपच ते लग्न अवैध ठरले. काही जमातीत आते-मामे भावंडांचे लग्न रास्त असते. निरनिराळे धर्म, जाती आपापल्या रिती-रिवाजाप्रमाणे काही नात्यांतही लग्न मान्य करीत नाहीत. प्रत्येक विवाहविषयक कायद्याच्या शेवटी परिशिष्टे असतात. त्यामध्ये त्या कायद्यानुसार कुठल्या नात्यात विवाहास बंदी आहे, याचा तक्ता दिलेला असतो. वर सूचित केल्याप्रमाणे मूलभूत नात्यात सर्वच कायद्यात बंदी आहे व बाकीच्या नात्यात थोडाफार फरक आहे.

शक्‍यतो जवळच्या नात्यात लग्न करू नये. रक्तदोष तसेच आनुषंगिक रोगाची संभावना तर वाढतेच; पण त्याबरोबर कौटुंबिक नात्यातील गुंफण पण जटिल होत जाते. समजा, आते-मामे भावंडांचे लग्न झाले आहे आणि काही कारणाने आत्या आणि मामांमध्ये भांडण झाले (मानपान, हेवेदावे, स्थावर जंगम मालमत्ता इ. अनेक कारणावरून) की त्याचा परिणाम दांपत्याच्या विवाह जीवनावर होतो आणि त्याच्या विवाहात विसंवाद निर्माण होण्याची शक्‍यता राहते. दोन्ही पालक आपापल्या अपत्यास आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतात.

काही प्रसिद्धीच्या वलयातील व्यक्ती विशेषतः नट, दिग्दर्शक इ. आपल्या पहिल्या पत्नीशी कायदेशीर घटस्फोट न घेता बेधडकपणे समाजाला धुडकावून दुसरा विवाह करतात, अशी ही तथाकथित विवाहित जोडपी कितीही वर्षे एकत्रित राहिली आणि त्यांना मुलेबाळे झाली तरी त्यांचा विवाह कायदेशीर ठरत नाही. हे सर्वसामान्य लोकांनी लक्षात ठेवावे. आपल्या जोडीदाराने कायदेशीर घटस्फोट न घेता दुसरा विवाह केला आहे, या कारणास्तव कायदेशीर पत्नी घटस्फोट मागू शकते. काही वेळेस नवरे घटस्फोटाचा दावा करतात.

घटस्फोट मिळवायच्या आतच दुसरा विवाह करतात. घटस्फोट मिळाला, की हा दुसरा विवाह आपोआप कायदेशीर होईल, अशी त्यांनी समजून असते. हे पण बरोबर नाही. त्यांना पहिल्या विवाहाच्या घटस्फोटानंतर पुन्हा विवाह करावा लागतो. तरच हा दुसरा विवाह कायदेशीर होतो. विवाहाच्या वेळी तुमचे स्टेटस (स्थान) स्पष्ट लागते. सिव्हिल मॅरेज करताना भरावयास लागणाऱ्या अर्जामध्ये याविषयी एक कलम असते. तुम्ही अविवाहित विधवा, विधुर किंवा घटस्फोटित आहात, हे त्या कलमामध्ये लिहावे लागते. घटस्फोटित असल्यास कोर्टाच्या हुकूमाची प्रत लागते.

घटस्फोटितांशी लग्न करताना घटस्फोटाच्या हुकूमनामा पाहणे अत्यावश्‍यक आहे. काही जणांना ती प्रत बघावयास मागणे संकोचाचे वाटते. ते दुसऱ्याच्या शब्दावर विश्‍वास ठेवून लग्न करतात; पण जर काही या संदर्भात समस्या उभी राहिली की घाबरून गोंधळून जातात. एका दाव्यात जेव्हा पहिल्या पत्नीने आपल्या नवऱ्यावर पोटगीची केस केली तेव्हा त्याच्या दुसऱ्या बायकोला कळले की त्याचा घटस्फोट झालेला नाही. तिचे स्थान डळमळीत झाले होते. मानसिक धक्का बसतो आणि मग घरच्यांना दोष देत राहतात. एका दाव्यात नवरा मेल्यानंतर दोन बायकांनी त्याच्या भविष्यनिधीची मागणी केली. पहिलीकडे तिच्या लग्नाचा दाखला नव्हता आणि दुसरीकडे पहिल्या घटस्फोटाचा दाखला नव्हता. कधी फसवाफसवी असते तर कधी अज्ञान.

काही जमातीमध्ये स्टॅंप पेपरवर लिहून नवरा-बायको घटस्फोट घेतात. यास "कस्टमरी डायर्व्होस' म्हणतात. तो फारच थोड्या जमातीमध्ये विधीग्राह्य आहे. (हा घटस्फोट त्या जमातीपुरताच ग्राह्य असतो.) असे हे कागद सरकारी कार्यालयात, बॅंकेत चालत नाहीत, तेव्हा घटस्फोटिताशी विवाह करताना कागद जरूर बघावा.

विवाहाने अनेक हक्क निर्माण होतात. हे नुसतेच शारीरिक, मानसिक नसून स्थावर जंगम मालमत्तेवरही असतात. तेव्हा या महत्त्वाच्या घटनेसाठी समाजाने कायद्याने नियम केले आहेत. ते विवाहाआधी समजून घेणे आपल्या हिताचे आहे.

Copied from  : http://www.esakal.in/lagnagaath/

No comments:

Post a Comment