Sunday, March 27, 2011

सुप्रजननम्‌

पाश्‍चात्त्य देशांत अपत्यप्राप्ती होण्याआधी "प्रिकन्सेप्शनल मेडिसीन' अर्थात, "सुप्रजननम्‌' ही कल्पना केव्हाच मूर्त स्वरूपात आलेली आहे. आपल्या देशात आयुर्वेदात सुप्रजनन कसे करावे म्हणजे चांगली गर्भधारणा आणि सुदृढ प्रजेची निर्मिती याचा विस्तृत ऊहापोह केला आहे आणि तो आयुर्वेदिक दृष्टिकोनातून आहे. आधुनिक वैद्यकशास्त्रात सुदृढ बाळ होण्यासाठी काय शक्‍य आहे, त्याचा आपण विचार करू यात.

सर्वप्रथम बघू यात, लग्नाच्या वेळी मुलामुलीचं वय काय असावं. कायद्याप्रमाणे मुलीचं लग्न करतेवेळी वय 18 वर्षांपेक्षा कमी, तसंच मुलाचं वय 21 वर्षांपेक्षा कमी नसावं. वैद्यकीय दृष्टिकोनातूनदेखील लहान वयात लग्न करणं अतिशय अयोग्य असतं. कोवळ्या वयात मुलीची शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्थिती बाळ होण्यास सर्वांगीणरीत्या परिपूर्ण नसते आणि अशा वेळी झालेली बाळं अपुऱ्या दिवसांची, कमी वजनाची असण्याची शक्‍यता खूप असते. म्हणूनच लग्न करतेवेळी मुलीचं वय 18 च्यावर व मुलाचं वय 21 वर्षांच्या वर असणं कायद्याच्या, वैद्यकशास्त्राच्या व इतरही दृष्टिकोनातून अगदी योग्यच आहे.

दुसरा मुद्दा आहे नात्यातल्या लग्नाचा. भारतात अशा अनेक जाती आहेत, की ज्यांच्यामध्ये आतेमामे भावंडं, मामाची मुलगी अशी नात्यातली लग्न, ही त्यांच्या समाजातली रूढ प्रथा आहे. नात्यात लग्न करण्याचा आनुवंशिक रोगाच्या दृष्टिकोनातून फार तोटा असतो. समजा नवरा आणि बायको आतेमामे भाऊ-बहीण आहेत. बाह्यतः दोघंही अगदी नॉर्मल आहेत. पण समजा ते दोघंही एका आनुवंशिक रोगाचे "कॅरिअर' म्हणजे "वाहक' आहेत व तो आनुवंशिक रोग थॅलेसिमिया आहे, तर अशा अवस्थेत मुलांना थॅलेसिमियाचा आजार होण्याची खूपच शक्‍यता असते आणि मग बाळाला ऍनिमिया होतो व सारखं रक्त भरावं लागतं. आईवडील जेव्हा नात्यातले असतात, तेव्हा त्या दोघांमध्ये थॅलेसिमियाची "वाहक' अवस्था असण्याची शक्‍यता खूप असते. कारण दोघांच्या "जीन्स' (गुणसूत्र) मध्ये समानता असणार, कारण त्यांचे पूर्वज एकच होते. म्हणूनच नात्यात लग्न केल्यास मुलांमध्ये आनुवंशिक आजार होण्याची शक्‍यता वाढते. अर्थातच नात्यातलं लग्न वैद्यकीय दृष्ट्या योग्य नाही. थॅलेसिमियाच्या आजाराची काही समाजात जसं की "कच्छी, लोहाना, बोहरी' यांच्यात 10 टक्‍क्‍याच्या वर "वाहक अवस्था' आढळून येते. सर्व सामान्यतः महाराष्ट्रात 3 टक्के व्यक्ती "कॅरिअर' किंवा "वाहक' आहेत. त्यामुळेच सर्व जोडप्यांची बाळ होण्यापूर्वी थॅलेसिमियाची चाचणी करावी, या संकल्पनेने सध्या मूळ धरलंय. आदिवासी समाजात दुसरा आनुवंशिक आजार म्हणजे की सिकलसेल ऍनिमिया आढळून येतो. त्यामुळे त्याचीदेखील चाचणी करावी.

तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इन्फेक्‍शन्स. आपल्या जोडीदाराला एचआयव्ही/ एड्‌सचा जंतुसंसर्ग नाही ना, हे पाहणे फार महत्त्वाचे असते. तसेच त्यास हिपॅटायटिस बी म्हणजे "ब' प्रकाराची कावीळ नाही, हेही बघणे योग्य ठरेल.

यानंतर आणखी एक महत्त्वाचं इन्फेक्‍शन म्हणजे जर्मन गोवर. समजा एखाद्या मुलीने लहानपणी एमएमआर (गोवर, गालगुंड व जर्मन गोवर) ची लस घेतलेली नाही आणि तिला गरोदरपणी पहिल्या तीन महिन्यांत जर्मन गोवर झाला, तर होणाऱ्या बाळाला मतिमंदत्व, छोटे डोके, बहिरेपण व हृदयविकार आणि कॅटॅरॅक्‍टचे अंधत्व येण्याचा धोका खूप जास्त असतो. हे सर्व आपल्याला सहज टाळता येणे शक्‍य आहे. कारण आज त्याची लस उपलब्ध आहे. जर्मन गोवराची लस गरोदर होण्याआधी तीन महिने घेतली तर हे सर्व टाळता येतं. याशिवाय टॉक्‍सोप्लासमोसिस वगैरेसारख्या इतर जंतूंनी बाळाला त्रास होऊ शकतो.

आईचं आणि वडिलांचं वय बाळ होतेवेळी फार जास्तसुद्धा नसलं पाहिजे. जर बाळ होतेवेळी आईचं वय 35 च्या वर असेल तर बाळास डाऊन सिंड्रोम होऊन मतिमंदत्व होण्याची शक्‍यता असते. तसेच वडिलांचे वय जास्त असले तर बाळात खुजेपणाचा आजार होण्याची शक्‍यता वाढते. भारतात लहान वयाच्या मातांमध्येदेखील डाऊनसिंड्रोमची बाळं झालेली आढळतात म्हणून त्यासाठी गरोदरपणी चाचण्या करणं योग्य ठरतं.

आईचा आहार बाळाच्या दृष्टीनंदेखील फार महत्त्वाचा असतो. जर आईनं गर्भ तयार होते वेळी पुरेशा हिरव्या पालेभाज्या (ज्यात फोलिक ऍसिड असते) खाल्ल्या नाहीत, तर बाळाला मेंदू व पाठीचे आवाळू असे दोष होऊ शकतात. त्याचप्रमाणे औषधे, क्ष किरण, दारू, तंबाखू, अमली द्रव्य, सगळ्याचा बाळावर हानीकारक परिणाम होऊ शकतो. याशिवाय हृदयविकार, मधुमेह यांसारख्या आनुवंशिक आजारांसंबंधीदेखील विचार व्हायला हवा.
 From : डॉ. मृदुला फडके, बालरोगतज्ज्ञ

Copied from : http://72.78.249.107/esakal/20110325/5159827724718239732.htm

No comments:

Post a Comment