Saturday, March 26, 2011

* विवाहसंस्कार विधी *

देव, ब्राह्मण, अग्नी अन उपस्थित समाज यांना साक्षी ठेवून संपन्न होणाऱ्या विवाहविधीस धर्मशास्त्रात मानाचे स्थान आहे. तसेच दानातील महान पुण्यकारक असे जे 'कन्यादान' त्याचेही महतभाग्य याच विवाह विधीद्वारे वधुपित्यास प्राप्त होते.

ज्या अनेक महत्त्वपूर्ण अन आवश्‍यक विधिसंस्कार यातून हा विवाहविधी साजरा होतो तो पुढीलप्रमाणे :-

पत्रिका आणि पसंती : अनुरूप वधू-वरांची निवड करीत असताना दोघेही परस्परांना शिक्षण, रूप, सांपत्तिक स्थिती या गोष्टींतून किती व कसे अनुरूप आहेत, हे पाहत असतानाच- उभयतांचे गण, गोत्र, गुण-मिलन अन चंद्रबल, लाभालाभ यांचा विचार पत्रिका पाहणे यात मोडतो. अन एकदा का ब्राह्मण, गुरुजी, ज्योतिषी यांच्याकडून पत्रिका जुळत असल्याचे समजले, वधू-वरांची व उभय घराण्यांची पसंती झाली, की मग प्रारंभ होतो पुढील कार्यक्रमांना!

प्रत्यक्ष लग्नाआधी एखादा चांगला दिवस पाहून वराकडील मंडळी वधूकडे जाऊन तिला समारंभपूर्वक कुंकू लावून साडी भेट देतात. या समारंभात उभय वधू-वरास यथोचित भेटवस्तूही देतात. तसेच पुढील कार्याच्या याद्या करणे, हळद फोडणे हे कार्यक्रमही याच वेळी करतात. या प्रारंभीच्या परिचय कार्यक्रमांची सांगता चहा-पान, फराळ याचबरोबर पेढेवाटपाने होते. वधूला साडीबरोबरच पेढ्याचा पुडा देतात अन म्हणूनच हा प्रसंग साखरपुड्याच्या गोडीने सर्वांच्या लक्षात राहतो.

पत्रिका : पसंती अन साखरपुडा झाला, की एकच धावपळ चालू होते अन मग वेध लागतात ते प्रत्यक्ष लग्नाच्या दिवसाचे.

सीमांत-पूजन : लग्नाच्या आदल्या दिवशी रात्री हा कार्यक्रम कार्यालयात साजरा होतो. पूर्वी वरपक्षाकडील मंडळींचे वधूपक्षाकडील मंडळींकडून गावच्या सीमेवर हे स्वागत पूजन होत असे. त्यावरून त्याचे नाव सीमांत-पूजन असे पडले आहे. त्यामागचा आणखी एक गूढार्थ असा, की आता उभय पक्षांकडील सीमांचा अंत होऊन दोघेही एकत्र येत आहोत अन पुढील कार्य हे समजूत, एकोपा, प्रेम अन जिव्हाळ्याने संपन्न करायचा आहे.

याच वेळी होणाऱ्या धार्मिक विधीचा नीट साधक-बाधक विचार केला, तर त्यालाच "श्रीमंत' किंवा "श्री' पूजन असेही मानणे योग्य ठरेल. कारण वधुपिता हा अनुरूप योग्य अशा त्या श्रीमानास आपण आपली कन्या प्रदान करत असतो ना!

घाणाभरण अन हळदी समारंभ : पूर्वी हे विधी विवाहाच्या आधी होत असले, तरी सध्या मात्र त्यामागची भावना, महत्त्व अन शास्त्र लक्षात घेता या गोष्टी विवाहाच्या दिवशीच कार्यालयात पहाटे केल्या जातात. आंब्यांच्या पानांना सुशोभित केलेल्या दोन मुसळांचे पूजन अन घाणाभरण्याच्या ओव्या म्हणत सुवासिनींद्वारे हा घाणा भरला जातो. त्याच मुसळांनी उखळ किंवा रोळीत उडीद, हळकुंड, सुपारी व तांदूळ कांडतात.

घाणाभरणानंतर त्यातीलच हळद वधू-वरांना लावतात. वधूस हळद लावून मंगलस्नान घालतात. वराकडून आलेली हळद वधूस लावण्याची जी पद्धत आहे, तीच या प्रकारच्या "उष्टी हळद' या नामाचे मर्म सांगून जाते.

देवदेवक/ पुण्याहवाचन : शास्त्रोक्त संकल्प, गणेशपूजा देव-देवक प्रतिष्ठापना, स्वस्तिवाचन, मातृका पूजन इ. गोष्टी ज्या कार्यक्रमात विधिपूर्वक केल्या जातात, त्यालाच देवक ठेवणे असे म्हणतात. हा विधी उभय पक्षांना वेगवेगळा करायचा असतो. याच वेळी यजमानास व नवरा-नवरीस जवळच्या व घरच्या आप्तेष्टांनी आहेर करायचा असतो. त्यालाच "घरचा आहेर' असेही म्हणतात.

गौरीपूजन : विवाहास सजून, नटूनथटून तयार झालेली नववधू बोहल्यावर येण्यापूर्वी जे गौरीहरांचे पूजन केले जाते त्यालाच गौरीहरपूजन असे म्हणतात. चौरंग किंवा पाटावर गौरीहर यांच्या प्रतिमा ठेवून त्याचे पूजन वधूने अक्षता समर्पित करीत व "हे गौरीमाते, मला सौभाग्य, सुख व संतती दे' अशी प्रार्थना करीत पूर्ण करायचे असते.

मंगलाक्षता आणि शुभमंगल सावधान : सुशोभित विवाह मंडपात वर येताच "मुलीचे मामा! मुलीला आणा' ही सूचना दिली जाते. अक्षतांचे वाटप होते. वधू-वरांच्या हाती पुष्पमाला देऊन त्यांना परस्परांसमोर दृष्टादृष्ट न होईल अर्थात अंतरपाट मध्ये धरून उभे केले जाते. दोघांच्याही मागे जवळचे नातेवाईक तसेच करवल्याही उभ्या असतात. मुहूर्ताच्या थोडे आधीच ईश-वंदना, शुभाशीर्वाद- अभीष्टचिंतनपर, काव्यात्मक जे भावप्रदर्शन केले जाते- तेच मंगलाष्टक गायन.
नंतर नियोजित मुहूर्त समयाला "तदेव लग्नं....' या मंगलाष्टकाने सांगता करीत शास्त्रोक्त मंत्रोच्चारांनी विवाह संपन्न केला जातो. अंतरपाट दूर केला जातो. वधू-वर परस्परांना पुष्पमाला घालतात. बॅंड वाजंत्री वाजते आणि टाळ्यांच्या गजरात लागले लग्न... झाला विवाह संपन्न याची ग्वाही मिळते.

कन्यादान : लग्नानंतर पूर्वाभिमुख उभ्या असणाऱ्या वराच्या ओंजळीत वधूपिता पाण्याची धार धरतो, ते पाणी वधूची आई घालते. त्या वेळी कन्यादानाचा मंत्रोच्चार होतो व "मी माझ्या कन्या आपल्याला दान देतो आहे' असे वधूपिता म्हणतो. तसेच या कन्यादानाची स्वीकृतीही तेथेच वरास द्यावी लागते. याच वेळी "धर्मेच, अर्थेच, कामेच नातिचरामि' असे अभिवचनही वरास वधूपित्याला द्यावे लागते.

कंकण बंधन व लाजा होम : कन्यादानानंतर ब्राह्मण, पुरोहित हे वधुवरांना कंकण बंधन करतात. त्यासाठी दुधात भिजवलेले सूत, दुहेरी सूत वराच्या कंठीजवळ वेष्टित असते. ते वधूच्या डाव्या मनगटावर बांधतात. तर वधूच्या कमरेजवळ वेढलेले सूत वराच्या उजव्या मनगटावर बांधतात. हे एक मंत्रोक्त नाजूक प्रीतीधाग्याचे अतूट बंधन असते. त्याच वेळेस वर वधूस सौभाग्याचे लेणे देतो. अर्थात मंगळसूत्र गळ्यात घालतो.

या वेळी वधू-वराने एकमेकांस डोके लावण्याचा जो प्रघात आहे, त्यामागे इथून पुढील भावी आयुष्यात परस्परांना एकमताने व एकविचाराने चालण्याची ग्वाही अभिप्रेत आहे.

त्यानंतर योनक नावाच्या अग्नीला तुपाची आहुती व वधूच्या भावाने बहिणीच्या हाती दिलेल्या लाह्या या वराने आपल्या हाती घेऊन त्या मंत्रोच्चारानुसार अग्नीस अर्पण करायच्या असतात. कानपिळीचा विधी येथेच संपन्न होतो. त्या वेळी अग्नीसाक्षीने आम्ही उभयता परस्परांवर प्रेम करून व सदैव एकमेकांच्या बरोबर निष्कपटपणे वागू, अशी शपथ घ्यावयाची असते.

सप्तपदी : "सात पाऊले संगती तुझ्या' असे म्हणत विवाह होमाच्या जवळ मांडलेल्या तांदळाच्या सात छोट्या छोट्या ढिगांवरून वरामागून वधू चालत जाते. ही सात पावलांची चाल सप्त जन्मांतरीच्या एकोप्याची व एकत्र वाटचालीची प्रतीकात्मक साक्ष असते. कार्यालयातील शेवटचा कार्यक्रम म्हणजे जेवण. या वेळी वधू पक्षाकडील मंडळी वर पक्षाकडील वडीलधाऱ्या मंडळींना मुलीची नीट काळजी घेण्याची व संगोपन करण्याची विनंती करतात.

गृहप्रवेश अन लक्ष्मीपूजन : आपल्या संस्कृतीप्रमाणे नवदांपत्यास "लक्ष्मीनारायण' मानण्याची पद्धत आहे. ज्या वेळी ही नूतन वधू आपल्या सासरी म्हणजे नवऱ्याचा घरात प्रवेश करते, त्याला गृहप्रवेश असे म्हणतात.

उंबरठ्यावरचे तांदळाचे माप लवंडून त्या नववधूने लक्ष्मीच्या सोनपावलांनी सुख-समृद्धीसह त्या घरात प्रवेस करावा, असाच या प्रथेमागचा खरा भावार्थ आहे. त्यानंतर घरी आलेल्या त्या गृहलक्ष्मीचे यथोचित पूजन करमे अन मग भरल्या तांदळाच्या ताटात सोन्याचा अंगठीने पुढील वैवाहिक जीवनातील तिच्या पतीच्या आवडीचे नाव लिहिले जाते. ते नावच तेथून पुढे ती सौभाग्यवती म्हणून धारण करते.

साखर वाटून हे नाव सर्वांना सांगितले जाते. असे आहेत हे विवाह सोहळ्यातील आवश्‍यक अन महत्त्वाचे विधी. अन असा आहे हा आगळावेगळा अन हवाहवासा वाटणारा संस्कार सोहळा!!

Copied from  : http://www.esakal.in/lagnagaath/

No comments:

Post a Comment