Monday, May 24, 2010

अमेरिकेतील मराठी शाळा...

अमेरिकेतील मराठी शाळा
सुहासिनी वर्टी , शनिवार, २२ मे २०१०
शीर्षक वाचून आश्चर्य वाटते ना? पण मी स्वत: या शाळेला भेट देऊन आले. या शाळेचे नाव ‘शिशु-भारती’ असून ती बोस्टन येथील लेक्झिंटन या ठिकाणी आहे. या शाळेत फक्त मराठीच नाही तर इतरही भारतीय भाषा म्हणजे गुजराथी, हिंदी, कन्नड, तामिळ भाषा शिकवतात. ही शाळा दर रविवारी दोन तास असते.
इतर शाळांसारखाच या शाळेतही अभ्यासक्रम आखलेला असतो. सहामाही, वार्षिक अशी लेखी तसेच तोंडी परीक्षाही असते व मुलांना परीक्षेचे महत्त्व कळावे म्हणून श्रेणी न देता मार्क्‍स देतात. पालकही ही परीक्षा गांभीर्याने घेत मुलांकडून अभ्यासाची जोरदार तयारी करून घेतात. दुसरीत असलेल्या माझ्या नातवाला आपल्या शालेय अभ्यासक्रमातील मराठीचे बालभारतीचे पुस्तक, रामायण- महाभारतातील गोष्टी, भाज्या, फळे, शरीराचे अवयव, नाती, ‘येरे येरे पावसा’सारखी कविता इ. अभ्यासक्रम होता.
या शाळेतील प्रत्येक वर्गाला वेगवेगळ्या विषयावर प्रोजेक्ट सादर करायचा असतो आणि प्रत्येक मुलाने स्वतंत्रपणे तो करायचा असतो. ठरवलेल्या दिवशी हे प्रकल्प सर्वाना पाहण्यासाठी मांडून ठेवले जातात आणि विद्यार्थी आपापल्या प्रोजेक्ट्सचे सादरीकरण करतात. यासाठी विषयही भारतासंदर्भातीलच असतात. उदा. भारतीय संशोधक, भारतीय नृत्य व संगीतप्रकार, भारतातील वाद्ये इ.
प्रकल्प सादरीकरणाच्या वेळी एका मुलाने तिथे ठेवलेला मृदंगही वाजवून दाखविला. भारतातील वीरांगना या विषयावर एक मुलगी राणी लक्ष्मीबाईच्या वेशात होती व आम्हाला राणी लक्ष्मीबाईचा तिने बनवलेला जीवनपट दाखवून त्याची इत्यंभूत माहितीही दिली. शाळेच्या प्राचार्या स्वत जातीने मुलांना प्रोत्साहन देत होत्या. शाळेविषयी काय वाटले, असे मतही त्या पालकवर्गाला विचारत होत्या.
या शाळेत फक्त भारतीयच नव्हे तर काही अमेरिकन मुलेही दिसली. ती मुलेही एखादी भारतीय भाषा शिकायला येतात, असे कळले.
शाळा सुरू होण्याअगोदर सर्व विद्यार्थी एका मोठय़ा हॉलमध्ये जमतात. तिथे ‘वंदे मातरम्’ म्हटले जाते व नंतर एखादे देशभक्तिपर गीत म्हटले जाते. त्यानंतर विद्यार्थ्यांना काही सूचना देण्यात येतातआणि नंतर विद्यार्थी आपापल्या वर्गात जातात.
भारतीय भाषा व भारतीय संस्कृती शिकवणारी अशी ही शाळा. परदेशात राहूनही मातृभाषा व मातृभूमीविषयी तळमळ असणारी ही माणसे बघून खूप समाधान वाटले.

Copied from : http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=71524:2010-05-21-08-36-15&catid=194:2009-08-14-02-31-30&Itemid=194

1 comment:

  1. याचा अर्थ उद्या अमेरिकेत स्थायिक झाल्यावर... मुलांचा मराठी शाळेचा प्रोब्लेम सुटला...
    आणि मुंबई कायमचं राहायचं असेल तर मुलांना फक्त इंग्लिश medium च्या शाळेत टाकावे लागेल... ;-)

    ReplyDelete