Tuesday, May 25, 2010

मराठमोळ्या गोसावींची ओमानमध्ये 'विजय' पताका

मराठमोळ्या गोसावींची ओमानमध्ये 'विजय' पताका
सकाळ वृत्तसेवा

मान सरकारच्या कृषि खात्याचे तज्ञ सल्लागार डॉ. विजय गोसावी यांना 'अमेरीकन बायोग्राफिकल इन्स्टिट्यूट' या जगविख्यात संस्थेने ओमानसाठीचे सुवर्ण पदक ('गोल्ड मेडल ऍवॉर्ड फॉर ओमान') देऊन गौरवले आहे. देशाच्या आर्थिक विकासात उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

कृषि, नियोजन आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञान क्षेत्रात डॉ. गोसावी यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. शैक्षणिक गुणवत्ता, वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रदीर्घ अनुभवामुळे त्यांची या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली विविध कामे व प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणी याचाही विचार संस्थेने डॉ. गोसावी यांना हा पुरस्कार देताना केला आहे. हा पुरस्कार मिळालेले डॉ. गोसावी हे ओमानमधील पहिलेच अनिवासी भारतीय असून त्यांना मिळालेला हा पुरस्कार ओमान सरकारच्या कृषि खात्यासाठी भूषणाची बाब आहे.

डॉ. गोसावी हे गेल्या दहा वर्षांपेक्षा जास्त काळापासून ओमान सरकारच्या नियोजन आणि गुंतवणूक महासंचालकांचे तज्ञ सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. प्रकल्पांचे मूल्यांकन आणि व्यावहारिकता अभ्यास (फिजिबिलीटी स्टडिज) हा त्यांच्या कामाचा गाभा आहे.

गेल्या पंधरा वर्षांपासून मस्कत येथे असलेल्या डॉ. व्ही. एस. उर्फ विजय गोसावी यांनी पुणे विद्यापीठातून एम.बी.ए. आणि पी.एच.डी. पर्यंत शिक्षण घेतले आहे.

१९९६ पासून ते ओमानच्या कृषि खात्यात सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. ओमानला रवाना होण्यापूर्वी ते किर्लोस्कर उद्योग समुहाच्या उपाध्यक्षांचे सल्लागार म्हणून कार्यरत होते. नियोजन हा त्यांच्या विशेष अभ्यासाचा विषय आहे. तंत्रज्ञान आणि निर्यात विकासासाठी त्यांनी आत्तापर्यंत जगातील १४० देशांचा दौरा केला आहे.

ओमानमध्ये त्यांनी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर (ग्रीन हाऊस) आणि मर्यादित प्रमाणात पाणी उपलब्ध असलेल्या भागात कृषि उत्पादनात वाढ करणे, अन्न सुरक्षा प्रकल्प, पर्यायी पिकांचे नियोजन आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न , शेतीमाल प्रक्रिया, निर्यातप्रधान उद्योग अशा विविध प्रकल्पांसाठी ते कार्यरत आहेत.

गेल्यावर्षी भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या ओमानभेटीत तेथील मान्यवरांसाठी आयोजित कार्यक्रमात डॉ. गोसावी यांना आमंत्रित करण्यात आले होते.या वेळी त्यांना पंतप्रधानांशी वैयक्तिक संवाद साधण्याची संधी मिळाली होती. डॉ. मनमोहन सिंग यांनी डॉ. देसाई यांचे ओमानमधील कार्याबद्दल विशेष अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment